
Narendra Modi : 'नव्या संसद भवनाचं पंतप्रधानांनी उद्घाटन करु नये'; राहुल गांधींची नेमकी भूमिका काय?
नवी दिल्लीः येत्या २८ तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. मात्र त्यांनी हे उद्घाटन करु नये, अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतली आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
देशाच्या नवीन संसद भवन इमारतीचं काम पूर्ण झालं आहे. सावरकर जयंतीनिमित्त २८ मे रोजी देशाच्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन ते करतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मोदींना २८ मे रोजी संसद भवनाच्या उद्घटनासंदर्भात माहिती दिली.
या मुद्द्यावरुन देशातलं राजकारण पेटलं आहे. राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून त्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांनी संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन करु नये, त्याऐवजी राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, असं म्हटलं आहे. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी मात्र पंतप्रधानांनी उद्घाटन करावं, असं आग्रह धरला आहे.
संसद भवनाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण झाली आहे. या उद्घाटनावरुन राजकारण पेटलं आहे. सावरकर जयंतीचं औचित्य अन् पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन या दोन्ही मुद्द्यांवरुन विरोधक रान पेटवण्याच्या तयारीत आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला विरोध केला आहे.
२८ महिन्यांमध्ये तयार झालं संसद भवन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी नवीन संसद भवनाच्या कामाचा शुभारंभ केला होता. १२०० कोटी रुपये खर्च करुन चार मजल्यांची इमारत उभी राहिली आहे. यामध्ये लोकसभेच्या ८८८ आणि राज्यसभेच्या ३८४ सदस्यांसाठी सदस्यांना बसण्याची व्यवस्था होणार आहे. फक्त २८ महिन्यांमध्ये ही इमारत बनून सज्ज झालीय.