
PM Narendra Modi : दौऱ्याचा प्रत्येक क्षण देशासाठी वापरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन देशांचा सहा दिवसीय दौरा आटोपून आज मायदेशी परतले. येथील पालम विमानतळाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. या दौऱ्याच्या कालावधीमध्ये आपण प्रत्येकक्षण हा देशाच्या हितासाठी वापरल्याचे त्यांनी नमूद केले.
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील कार्यक्रमाला केवळ त्या देशाचे पंतप्रधानच नाही तर सत्ताधारी पक्षाचे नेते, माजी पंतप्रधान आणि विरोधी पक्षांचे सदस्य देखील उपस्थित होते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
ऑस्ट्रेलियात लोकशाहीचे वातावरण होते. प्रत्येकजण भारतीय समुदायाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. लोकशाहीच्या आत्म्याचे आणि ताकदीचे हे दर्शन होते. प्रत्येकाने भारतीय प्रतिनिधीला सन्मान दिला, हा काही मोदींच्या जयजयकाराचा विषय नव्हता तर त्यातून भारताच्या सामर्थ्याचे दर्शन झाले असे मोदी यांनी सांगितले.
दरम्यान भारतामध्ये नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधी पक्षांनी घातलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जाते. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात विरोधकांचा थेट उल्लेख केला नसला तरी त्यांच्या बोलण्याचा रोख हा त्यांच्याच दिशेने होता.
आव्हानांना आव्हान देतो
मी भारताबाबत आणि येथील लोकांबाबत तिथे मोठ्या विश्वासाने बोलू शकलो आणि तेथील लोकांनी देखील ते ऐकून घेतले कारण येथील लोक हे बहुमताने सरकारची निवड करतात. मी जे काही बोलतो तो १४० कोटी भारतीयांचा आवाज असल्याचे जागतिक नेत्यांना ठावूक आहे. आपल्यासमोरील आव्हाने मोठी आहेत पण मी आव्हानांना आव्हान देणे पसंत करतो. आज भारत काय विचार करतो हे जगाला जाणून घ्यायचे आहे, असे मोदींना सांगितले.
आम्ही शत्रूची देखील काळजी घेतो
प्रशांत महासागरातील देशांकडून आपल्याला मोठी आदराची वागणूक मिळाली. कोरोना महामारीच्या काळामध्ये भारताने त्यांना लसी पाठविल्याबद्दल त्यांनी आपले आभार मानले. कधीकाळी येथील विरोधक आपण त्यांना कशासाठी लशी पाठवीत आहोत? अशी विचारणा करत होते, असा टोलाही मोदींनी त्यांना लगावला. ही बुद्धाची आणि गांधींची भूमी आहे. आम्ही शत्रूची देखील काळजी घेतो, असेही मोदींना सांगितले.
दिल्ली- डेहराडून वंदे भारत सुरू
डेहराडून ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिल्ली ते डेहराडून दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवून तिचा प्रारंभ करण्यात आला. राज्यातील पूर्ण विद्युतीकरण झालेल्या लोहमार्गाचे देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. या नव्या रेल्वे सेवेमुळे राजधानी ते डेहराडूनदरम्यानचा प्रवासाचा कालावधी साडेचार तासांनी कमी होणार आहे. जागतिक पर्यटक आज भारताला भेट देऊन जाणून घेऊ इच्छितात ही उत्तराखंडसाठी मोठी संधी असल्याचे मोदी म्हणाले.