जागतिकीकरणासोबत आत्मनिर्भरता महत्त्वाची; IIT च्या पदवीदान सोहळ्यात पंतप्रधानांचे प्रतिपादन

pm modi
pm modi

नवी दिल्ली - जागतिकीकरण महत्त्वाचे असले तरी आत्मनिर्भरता देखील आवश्‍यक आहे, हाही मंत्र कोरोना महामारीने साऱ्या जगाला दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्लीच्या (आयआयटी) ५१ व्या पदवीदान कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीत तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. आजच्या कार्यक्रमात आयआयटीच्या विद्यार्थ्यांना २०१९-२० या वर्षाची पदवी प्रदान करण्यात आली. कोरोना महामारीनंतरच्या जगात तंत्रज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व मिळेल असेही ते म्हणाले.

अतिशय कठीण अशी जेईई परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही आयआयटीमध्ये आला आहात. तुमच्यात प्रचंड क्षमता आहे. मात्र लवचिकता व विनम्रता या दोन गोष्टी तुमच्या क्षमतावृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील असे पंतप्रधानांनी नमूद केले. आयआयटीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले की गुणवत्तेशी तडजोड करू नका. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास खळखळ करू नये आणि अस्थिरता हा आयुष्याचाच एक मार्ग असल्याने त्याची तयारी ठेवावी.व्यक्तिगत प्रयत्नांना मर्यादा असतात. त्यामुळे संघभावनेने काम करण्याची मानसिकता ठेवावी. नव्या शतकासाठी नवे संशोधन, नवे संकल्प व नवे कायदे गरजेचे आहेत असे मोदींनी सांगितले.

भारतात युवकांना स्वतःचा व्यवसाय-उद्योग सुरू करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असे सांगून मोदी म्हणाले, की देशवासीयांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी युवकांनी नवीन संशोधन पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. देशवासीयांना जगण्यातील सोपेपणा देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले तर देश तुम्हाला उद्योग-व्यवसाय करण्यास सुलभता देईल, हे स्पष्ट आहे.

कृषी देशातील स्टारटप्ससाठी सध्या कधी नव्हे इतक्‍या संधी निर्माण झाल्या आहेत. अंतराळ संशोधन, बीपीओ, आयटी आदी अनेक क्षेत्रांतही यापूर्वी देशात कधीही झाल्या नव्हत्या, अशा सुधारणांना गती मिळाली आहे. घरातून किंवा कार्यालयाबाहेरून काम करण्यासाठी अडथळे आणणारे अनेक नियम बदलण्यात आले आहेत. यामुळे आयटी क्षेत्राच्या जागतिक व्यापकतेची शक्‍यता वाढली आहे व प्रतिभावंत तरुणांना अधिकाधिक संधी उपलब्ध होतील असंही मोदींनी सांगितलं.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com