...तर पंतप्रधान मोदी तुरुंगात जातील : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 1 डिसेंबर 2018

''राफेल करार प्रकरणाची चौकशी केली गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तुरुंगात जातील. मोदीजींना फक्त भ्रष्ट म्हणता येऊ शकत नाही. मात्र, ते खरंच भ्रष्ट आहेत. त्याबाबत कोणतीही शंका उपस्थित करण्याचे कारण नाही''.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : ''राफेल करार प्रकरणाची चौकशी केली गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी तुरुंगात जातील. मोदीजींना फक्त भ्रष्ट म्हणता येऊ शकत नाही. मात्र, ते खरंच भ्रष्ट आहेत. त्याबाबत कोणतीही शंका उपस्थित करण्याचे कारण नाही'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

इंदोर येथे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. ते म्हणाले, ''राफेल करार हे एक खुलं प्रकरण आहे. ज्यादिवशी याप्रकरणाची चौकशी सुरु होईल. तेव्हा पंतप्रधान मोदी तुरुंगात जातील. मात्र, फक्त यावरच प्रश्न उपस्थित केले जातील. आणखी काहीही याबाबत होणार नाही''. तसेच ते पुढे म्हणाले, ''राफेल प्रकरणाची फ्रान्समध्ये चौकशी सुरु होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी अनिल अंबानींना फायदा व्हावा, यासाठी प्रत्येक प्रक्रिया आणि कायद्याचे उल्लंघन केले. राफेल करारापेक्षा असे असंख्य गैरव्यवहार आहेत, ते राफेलपेक्षा मोठे आहेत''. 

शबरीमलाबाबत माझे आणि पक्षाचे विचार वेगळे

महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेत. त्यामुळे त्यांना कोठेही जाण्याची परवानगी असायला हवी. केरळमध्ये पक्षाचे यावर असे मत आहे, की महिला आणि पुरुषांमध्ये अनेक भावनात्मक मुद्दे आहेत. मात्र, याबाबत माझे आणि पक्षाचे विचार वेगळे आहेत, असेही ते म्हणाले.

Web Title: PM Narendra Modi will go to jail Congress President Rahul Gandhi talked about Rafel Deal