'...तर लोकपालसमोर उपस्थित होणारे पंतप्रधान पहिले आरोपी'

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

सरकारने लोकपालची नियुक्ती केली असती तर राफेलप्रकरणी लोकपालसमोर उपस्थित राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले आरोपी राहिले असते, असे खळबळजनक वक्तव्य आज कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी केले. लोकसभेत मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना मोईली यांनी आगामी काळात राफेलचा पराभव होईल आणि राहुल गांधी यांचा विजय होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. 

नवी दिल्ली : सरकारने लोकपालची नियुक्ती केली असती तर राफेलप्रकरणी लोकपालसमोर उपस्थित राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले आरोपी राहिले असते, असे खळबळजनक वक्तव्य आज कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी केले. लोकसभेत मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना मोईली यांनी आगामी काळात राफेलचा पराभव होईल आणि राहुल गांधी यांचा विजय होईल, असा विश्‍वास व्यक्त केला. 

मोईली यांनी संरक्षण अर्थसंकल्पाचा उल्लेख करत राफेल कराराला गैरव्यवहाराची उपमा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "न खाऊँगा, न खाने दूँगा' या वक्तव्याचा उल्लेख करत मोईली म्हणाले की, या प्रकरणात दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. राफेल विमानाच्या खरेदीच्या विरोधात आम्ही नाही, मात्र सरकारने एचएएलला कमकुवत केले आहे. संरक्षणविषयक उत्पादनाचा एचएएलला 70 वर्षांचा अनुभव आहे. सरकारने लोकपालची नियुक्ती का केली नाही, हे आता स्पष्ट होत आहे. कारण, जर लोकपालची नियुक्ती केली असती राफेल प्रकरणावरून लोकपालसमोर उपस्थित राहणारे पंतप्रधान हे पहिले आरोपी ठरले असते.

सरकारने महिला, सामाजिक न्यायसाठी अर्थसंकल्पात कमी तरतूद केली आणि प्रचारावर मात्र हजारो कोटी खर्च केले आहेत. नोटाबंदीच्या रूपातून सरकारने पाप केले असून, यासाठी जनता कधीही माफ करणार नाही. जीएसटीमुळे लहान व्यापाऱ्यांची स्थिती बिघडली आहे आणि गुंतवणुकीच्या आघाडीवरही सरकारची बाजू कमकुवत राहिली आहे. विविध मुद्‌द्‌यांवर सरकार खोटे बोलत असून, आगामी काळात राफेलचा पराभव होईल आणि राहुल गांधी यांचा विजय होईल. 

लोकपालची नियुक्ती केली असती तर राफेलप्रकरणी लोकपालसमोर उपस्थित होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले आरोपी ठरले असते. आगामी काळात राफेलचा पराभव होईल आणि राहुल गांधी यांचा विजय होईल. - वीरप्पा मोईली, कॉंग्रेस ज्येष्ठ नेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Would Be Main Accused In Rafale If Lokpal Was There says Veerappa Moily