"पीएनबी'ची विक्रमी कर्जवसुली

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जुलै 2018

गैरव्यवहारात अडकलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) चालूू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 7 हजार 700 कोटी रुपयांच्या थकीत कर्जांची वसुली केली आहे. मागील आर्थिक वर्षात बॅंकेने वसूल केलेल्या एकूण थकीत कर्जांपेक्षा पहिल्या तिमाहीतील वसुली अधिक ठरली आहे. 

 

नवी दिल्ली : गैरव्यवहारात अडकलेल्या पंजाब नॅशनल बॅंकेने (पीएनबी) चालूू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 7 हजार 700 कोटी रुपयांच्या थकीत कर्जांची वसुली केली आहे. मागील आर्थिक वर्षात बॅंकेने वसूल केलेल्या एकूण थकीत कर्जांपेक्षा पहिल्या तिमाहीतील वसुली अधिक ठरली आहे. 

"पीएनबी'मध्ये हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुमारे 14 हजार कोटी रुपयांचा कर्ज गैरव्यवहार केला होता. यामुळे बॅंकेच्या आर्थिक स्थितीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर अवसायन व दिवाळीखोरी कायद्यांतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेचा "पीएनबी'ला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्याच तिमाहीत बॅंकेला 3 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम या प्रक्रियेतून मिळाली आहे. 

याविषयी पीएनबीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता म्हणाले, ""मागील आर्थिक वर्षात बॅंकेने एकूण 5 हजार 400 कोटी रुपयांच्या थकीत कर्जांची वसुली केली होती. चालू आर्थिक वर्षातील पहिल्याच तिमाहीत बॅंकेने 7 हजार 700 कोटी रुपयांची थकीत कर्जे वसूल केली आहेत. पहिल्या तिमाहीत भूषण स्टील आणि इलेक्‍ट्रोस्टील या दोन कंपन्यांच्या अवसायन व दिवाळखोरी प्रकियेतून बॅंकेचे सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे थकीत कर्ज वसूल झाले. पुढील काळात एस्सार स्टील आणि भूषण पॉवर यांच्या प्रक्रियेतून बॅंकेची थकीत कर्जांची मोठी वसुली होईल.'' 

पोलाद क्षेत्राकडे 9 हजार कोटी 
"बॅंकेने मोठे थकीत कर्ज असलेल्या 12 खात्यांची पहिली यादी तयार केली आहे. यातील 9 खात्यांवरील थकीत कर्ज 12 हजार कोटी रुपये आहे. केवळ पोलाद क्षेत्रातील कंपन्यांकडे यातील 9 हजार कोटी रुपये थकीत कर्ज आहे. बॅंकेच्या दुसऱ्या यादीत थकीत कर्ज असलेली 28 पैकी 20 खाती आहेत. त्यांच्याकडे 6 हजार 500 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. चालू आर्थिक वर्षात ही वसुली होणे अपेक्षित आहे,'' असे सुनील मेहता यांनी सांगितले. 
 
थकीत कर्ज वसुली 
(आकडे कोटी रुपयांमध्ये) 
आर्थिक वर्ष 2017-18 : 5,400 
एप्रिल ते जून (2018) : 7,700 

Web Title: PNB recovers huge amount of loan money