दोषींची हयगय करणार नाही 'पीएनबी' प्रमुखांचा इशारा

पीटीआय
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

बॅंकेची 123 वर्षांची परंपरा असून, यादरम्यान अनेक चढ उतार बॅंकेने अनुभवले आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक सेवेसाठी बॅंक कटिबद्ध असल्याचे मेहता यांनी सांगितले. बॅंकेमध्ये 2011 पासून हे गैरव्यवहार सुरू आहेत. 25 जानेवारी रोजी हे गैरव्यवहार बॅंकेच्या निदर्शनात आले. त्यानंतर तपास यंत्रणांना माहिती दिली असून, "सीबीआय'कडे तक्रार दाखल केल्याचे मेहता यांनी सांगितले

नवी दिल्ली - बॅंकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला अंधारात ठेवून नियोजनबद्धपणे झालेल्या 11 हजार 360 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारात आतापर्यंत 10 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोषींची हयगय केली जाणार नाही, असा इशारा पंजाब नॅशनल बॅंकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता यांनी दिला. घोटाळा उघड झाल्यानंतर प्रथमच "पीएनबी'च्या वरिष्ठ व्यवस्थापनाने गुरुवारी ( ता.15) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन यासंबंधीची माहिती माध्यमांना दिली. "पीएनबी' सक्षम असून लवकरच बॅंक या संकटातून उभारी घेईल, असे सांगत त्यांनी ठेवीदारांना आश्‍वस्त केले.

बॅंकेची 123 वर्षांची परंपरा असून, यादरम्यान अनेक चढ उतार बॅंकेने अनुभवले आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक सेवेसाठी बॅंक कटिबद्ध असल्याचे मेहता यांनी सांगितले. बॅंकेमध्ये 2011 पासून हे गैरव्यवहार सुरू आहेत. 25 जानेवारी रोजी हे गैरव्यवहार बॅंकेच्या निदर्शनात आले. त्यानंतर तपास यंत्रणांना माहिती दिली असून, "सीबीआय'कडे तक्रार दाखल केल्याचे मेहता यांनी सांगितले. बॅंकेने सर्व शाखांची तपासणी केली असून, सध्यातरी मुंबईतील एकाच शाखेमध्ये हा घोटाळा झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारचे या प्रकरणावर लक्ष असून तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करू, असे मेहता यांनी सांगितले. गैरव्यवहारात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: pnb scam nirav modi