दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस कारवाई : आनंद तेलतुंबडे

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

पुणे पोलिस परिसरात दाखल झाल्याचे परुळेकर यांनी सांगितल्यानंतर मला धक्का बसला. दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली.

- आनंद तेलतुंबडे, प्राध्यापक,  गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाविद्यालय

नवी दिल्ली : मी विमानप्रवास करुन घरी रात्री उशिरा परतल्यानंतर प्राध्यापक अजित परूळेकर यांचा मिस्ड्कॉल पाहिला. अजित परुळेकर माझे सहकारी असून, ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक आहेत. पुणे पोलिस परिसरात दाखल झाल्याचे परुळेकर यांनी सांगितल्यानंतर मला धक्का बसला. दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली, असा आरोप 'गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' महाविद्यालयाचे प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांनी केला. 

तेलतुंबडे म्हणाले, ''मी कार्यालयीन मिटिंगसाठी सकाळी दहाच्या सुमारास गेलो होतो. त्यादरम्यान मी केवळ मिटिंगबाबतच विचार करत होतो. त्यावेळी मला अनेक फोन आले होते. पण मी माझा फोन सायलंटवर ठेवला होता. त्यानंतर सर्व वृत्तवाहिन्यांवर देशभरातील काही ठिकाणी छापेमारीची कारवाई केल्याच्या बातम्या झळकत होत्या. या छापेमारीच्या कारवाईमध्ये काहींना अटकही केल्याचे सांगितले होते. त्यानंतर मी माझ्या पत्नीला फोन केला. तेव्हा तिने घरी शोधमोहीम सुरु असल्याचे सांगितले. पोलिसांची कारवाई हे दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी केली जात आहे''.

दरम्यान, पोलिसांच्या पथकाने आनंद तेलतुंबडे यांच्या साखळी येथील निवासस्थानी छापा टाकला. मात्र, ते घरी सापडले नाहीत. या महाविद्यालय परिसरात प्राध्यापकांना निवासाची सोय असलेल्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Police Action Against Me Intended to Create Atmosphere of Terror says Anand Teltumbde