3,700 कोटींची ऑनलाईन फसवणूक; टोळीला अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

युजर्सना आकर्षित करण्यासाठी या टोळीने गुंतवणुकीसाठी चार वेगवेगळे पॅकेजेस असल्याचे भासविले होते. पैसे गुंतविल्यानंतर ही टोळी युजर्सना काही वेब पेजेसच्या लिंक्‍स पाठवित होती. लिंकवर क्‍लिक केल्यानंतर प्रत्येक क्‍लिकला पाच रुपये देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या सर्व लिंक्‍स बनावट होत्या.

नोएडा - ऑनलाईन फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून साडे सहा लाख युजर्सची तब्बल 3 हजार 700 कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे.

नोएडातील सेक्‍टर 63 मधून उत्तर प्रदेश पोलिसांनी अनुभव मित्तल, श्रीधर प्रसाद आणि महेश दयाल यांना ताब्यात घेतले आहे. गाझियाबादमधील मित्तल हा बी.टेक. पदवीधारक असून या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. तर प्रसाद हा विशाखापट्टनममधील आणि दयाल मथुरेचा आहे. socialtrade.biz या संकेतस्थळाद्वारे हे तिघे युजर्सना ऑनलाईन पैसे कमाविण्याचे आमीष दाखवित होते. मात्र त्यासाठी युजर्सना 5,750 ते 57,500 दरम्यान कितीही रक्कम गुंतविणे आवश्‍यक असल्याचे सांगत होते. दरम्यान, ही टोळी वेळोवेळी संकेतस्थळाचे नाव बदलत होती. याद्वारे त्यांनी आतापर्यंत साडे सहा लाख लोकांना फसवून त्यांच्याकडून 3 हजार 700 कोटी रुपये मिळविले आहेत, अशी माहिती विशेष कृती दलातील पोलिस निरीक्षक त्रिवेणी सिंह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

ऑगस्ट 2015 पासून फसवणुकीचा हा प्रकार सुरू होता. युजर्सना आकर्षित करण्यासाठी या टोळीने गुंतवणुकीसाठी चार वेगवेगळे पॅकेजेस असल्याचे भासविले होते. पैसे गुंतविल्यानंतर ही टोळी युजर्सना काही वेब पेजेसच्या लिंक्‍स पाठवित होती. लिंकवर क्‍लिक केल्यानंतर प्रत्येक क्‍लिकला पाच रुपये देण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या सर्व लिंक्‍स बनावट होत्या, असे सिंह यांनी यावेळी सांगितले. अब्लेझ इन्फो सोल्युशन्स प्रा. लि. या नावाने ही टोळी काम करत होती. या नावे असलेल्या बँक खात्यामध्ये तब्बल 500 कोटी रुपये जमा असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी या संदर्भातील कागदपत्रे जप्त केले असून या प्रकाराबाबत पोलिसांनी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया आणि प्राप्तिकर विभाग आणि सेबीला कळविले आहे.

Web Title: UP police bust online fraud of Rs 3,700 cr