'यूपी'त जमावाकडून कॉन्स्टेबलची हत्या 

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

गाझीपूर जिल्ह्यातील कथवा ब्रिजजवळ ही घटना घडली. संबंधित आंदोलक हे निशाद पार्टीशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वत्स हे येथील करीमुद्दीननगर पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते. येथील आयटीआय ग्राउंडवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करीमुद्दीनपूर येथील ठाणे अंमलदारासह अन्य चार कॉन्स्टेबलना तैनात करण्यात आले होते. सभा आटोपल्यानंतर हे सर्व कर्मचारी घरी परतत असताना त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. 

लखनौ : उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा माथेफिरू जमावाच्या हल्ल्यामध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलचा बळी गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गाझीपूरमधील सभा आटोपल्यानंतर घरी निघालेले कॉन्स्टेबल सुरेश वत्स हे आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत गंभीर जखमी झाले होते. या जखमी अवस्थेतच त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेथेच डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

गाझीपूर जिल्ह्यातील कथवा ब्रिजजवळ ही घटना घडली. संबंधित आंदोलक हे निशाद पार्टीशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वत्स हे येथील करीमुद्दीननगर पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते. येथील आयटीआय ग्राउंडवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी करीमुद्दीनपूर येथील ठाणे अंमलदारासह अन्य चार कॉन्स्टेबलना तैनात करण्यात आले होते. सभा आटोपल्यानंतर हे सर्व कर्मचारी घरी परतत असताना त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. 

दरम्यान, निषाद समुदायाला आरक्षण मिळावे म्हणून निषाद पार्टीचे शेकडो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले होते. गाझीपूरमध्ये अनेक ठिकाणांवर त्यांनी गाड्यांची तोडफोडही केली. नौनेरा भागात अटवा मोर पोलिस ठाण्यानजीक जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये दोन स्थानिक नागरिकही जखमी झाल्याचे समजते. दरम्यान, या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वत्स कुटुंबीयांना पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्यात येईल, तसेच वत्स यांच्या पत्नीला विशेष निवृत्तिवेतन देण्याची घोषणाही राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. या घटनेतील दोषींना तातडीने अटक केली जावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

Web Title: Police constable killed in UP's Ghazipur by stone-throwing mob