बुलेटप्रूफ जॅकेटअभावी पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू 

पीटीआय
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

बुलेटप्रूफ जॅकेटअभावी एका पोलिस अधिकाऱ्याला प्राण गमवावे लागणे या पेक्षा जास्त शरमेची गोष्ट दुसरी काय असेल? 

- जगदानंद सिंह, राजदचे नेते 

पाटणा : पाटण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार आज आधुनिक पोलिस भवनाचे उद्‌घाटन करत असताना दुसरीकडे, बुलेटप्रूफ जॅकेटअभावी एका पोलिस अधिकाऱ्याचा दरोडेखोरांबरोबरच्या चकमकीत मृत्यू झाला.

पाटण्यातील पोलिस भवनाला 320 कोटी रुपये खर्च आला आहे. खगडिया जिल्ह्यातील परबत्ता येथील ठाण्यात पोलिस अधिकारी आशिष नेमणुकीस होते. दियारामध्ये दरोडेखोर जमल्याचे कळताच त्यांनी काही पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोरांबरोबर चकमक सुरू असताना आशिष त्यांच्या अगदी जवळ गेले आणि गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे बुलेटप्रूफ जॅकेट नसल्याची माहिती मिळाली आहे. चकमकीत एक दरोडेखोरही ठार झाल्याचे कळते. 

पाटण्यातील पोलिस भवनात सर्व आधुनिक सुविधा आहेत. "तुम्हाला चांगली इमारत दिली आहे; आता कामही तसे करून दाखवा. सर्वसामान्यांचे रक्षण करा, त्यांना देवाच्या भरोशावर सोडू नका,' अशा कानपिचक्‍या नितीशकुमार यांनी पोलिसांना दिल्या. त्यांच्या या भाषणानंतर काही तासांतच आशिष यांना प्राण गमवावे लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Officer dies due to bulletproof jacket