पोलिसांनी कार्यपद्धतीत बदल करावा : योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

लखनौ: राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास आपली सर्वोच्च प्राथमिकता असून, त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा, अशी अपेक्षा उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.

लखनौ: राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास आपली सर्वोच्च प्राथमिकता असून, त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा, अशी अपेक्षा उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी आदित्यनाथ यांनी पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यशैलीत बदल करणे गरजेचे आहे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. पोलिसांनी नागरिकांशी थेट संपर्क साधावा आणि लहानसहान घटनांची माहिती घेऊन त्याबाबतची संपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे भविष्यातील मोठ्या घटना टाळल्या जातील, असे नमूद केले. त्यांनी ग्रेटर नोईडा आणि संत कबीरनगर येथे झालेल्या घटनेबाबत चर्चा केली. या घटनेची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, पोलिस खात्यातील सर्व विभागांनी कृती योजना तयार करून ती सादर करावी. भविष्यात कायदा आणि सुव्यवस्था आणि पोलिसांची कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी आपण वेळ पडली तर प्रत्यक्ष भेटी देऊ. तोपर्यंत पोलिसांनी आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करून आणावी, अशी तंबीही मुख्यमंत्र्यांनी दिली. पोलिसांनी आपल्या व्यग्र कार्यक्रमातून काही वेळ काढून सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर विविध भागात पायी दौरा करावा, जेणेकरून नागरिकांत विश्‍वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, असे आदित्यनाथ म्हणाले.

Web Title: The police should change the way it works: Yogi Adityanath