'पप्पा, नका ना जाऊ कामाला'च्या व्हिडिओने आणले डोळ्यात पाणी

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मे 2019

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पोलिस कर्मचारी तयारी करुन घरातून बाहेर निघत असतो. त्यावेळी चिमुकला पाय धरून रडत असतो. पोलिस कर्मचारी मुलाला वारंवार समजवण्याचा प्रयत्न करत असतात.

नवी दिल्ली: 'पप्पा, नका ना जाऊ कामाला' या 1.25 सेकंदाच्या व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. चिमुकला आपल्या वडीलांना करत असलेली विनवणी पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत.

सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेले व्हॉट्सऍप, फेसबुक व ट्विटरवरून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेचे व्रत घेतलेले पोलिस हे आपल्या कुटुंबियांपासून बाहेर असतात. सण-समारंभामध्ये त्यांना सहभागी होता येत नाही. पोलिसांनाही कुटुंब असते व सुरक्षेसाठी पोलिस जेंव्हा घरातून बाहेर पडतो, तो पुन्हा घरी कधी परतेल याचा नेम नसतो. अचानक काही घडले तर पोलिसांना घरी जाता येत नाही. 24 तास ऑन ड्युटी असणाऱ्या या पोलिसांना कुटुंबियांसाठी वेळ देता येत नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून हे चित्र पाहिल्यानंतर अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त झाले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक पोलिस कर्मचारी तयारी करुन घरातून बाहेर निघत असतो. त्यावेळी चिमुकला पाय धरून रडत असतो. पोलिस कर्मचारी मुलाला वारंवार समजवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र,  मुलगा कोणत्याही परिस्थितीत वडिलांना सोडायला तयार नाही. मुलगा वडिलांचे पाय धरून जोरजोरात रडू लागतो. तो पोलिस कर्मचारी मी घरी लवकर परततो, असे अनेकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. मात्र, मुलाचे रडणे थांबत नाही.

पोलिस विभागातील अरुण बोथ्रा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. पोलिस आपल्या शरीरावर वर्दी चढवून तयार होतो. त्यावेळी त्याचा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, 'ही वेळ पोलिसाच्या नोकरीची सर्वात भावूक वेळ असते. कठीण प्रसंग आणि 24 तास ड्युटी अशा परिस्थितीतून पोलिस अधिकाऱ्यांना या स्थितीचा सामना करावा लागतो.' दरम्यान, व्हिडिओमधील परिस्थिती एका पोलिसाची नसून, पोलिस दलात काम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंमतर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवताना पोलिसांच्या कार्याला सलाम केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police tells son stopping him from going to work viral video