कर्नाटकात २५ मेनंतर घडणार राजकिय परिवर्तन

कर्नाटकात २५ मेनंतर घडणार राजकिय परिवर्तन

बेळगाव/बंगळूर - राज्यातील युती सरकारला सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एक बॉम्ब टाकला आहे. गोकाक येथे पत्रकारांशी बोलताना, २५ मेनंतर राज्यात राजकीय ध्रुवीकरण होणार असल्याचे ते म्हणाले. त्यांचे बंधू व बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. महिनाभर विदेश दौऱ्यावर जाऊन काही दिवस तटस्थ रहाणार असल्याची भूमिका घेतलेल्या आमदार जारकीहोळींनी पुन्हा बॉम्ब टाकून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे.

आमदार जारकीहोळी यांनी, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय परिवर्तन होईल. कोणाच्या लाल दिव्याच्या गाडीला घाबरण्याची गरज नाही. विश्वासघातकीना त्यांची जागा दाखवून देण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. लवकरच आपल्याकडे मोठे अधिकार येणार असल्याचेही ते म्हणाले. बंगळूरमध्ये असंतुष्ट आमदारांनी त्यांना सहकार्य दिले नाही. त्यामुळे ते एकाकी पडले होते. शेवटी मुख्यमंत्री कुमारस्वामींची भेट घेऊन त्यांनी युती सरकारला अभय दिले व पुन्हा बेळगावला परतले होते.

दरम्यान, रमेश जारकीहोळी व अन्य असंतुष्ट आमदारांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत कोणत्याच हालचाली न करण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकीच्या निकालावरच राज्यातील राजकीय हालचाली अवलंबून रहाणार आहेत. निकाल कसाही लागला, तरी राज्यातील युती सरकारवर त्याचा परिणाम होऊ नये, यासाठी त्यांना धजदमध्ये प्रवेश देऊन मंत्रिपद देण्याची मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ग्वाही दिली होती. त्यातच जारकीहोळी यांनी दुसरी घोषणा करून सर्वांनाच धक्‍का दिला आहे.

कुमठळ्ळी-जारकीहोळींची भेट
अथणीचे आमदार महेश कुमठळ्ळी यांनी गोकाक येथे रमेश जारकीहोळी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी राजकीय विषयावर त्यांनी कोणतेच वक्तव्य केले नाही. मात्र, अथणीच्या पाणीप्रश्नावर चर्चा झाल्याचे ते म्हणाले. रमेश जारकीहोळी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी दोन दिवसात पाणीप्रश्नी चर्चा करण्याची ग्वाही दिल्याचे सांगून महाराष्ट्र सरकार लवकरच कृष्णा नदीत पाणी सोडेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. मात्र, आमदार कुमठळ्ळी व जारकीहोळी भेटीमुळे पुन्हा युती सरकारविरोधी हालचाली चालू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com