सिद्धरामय्या भ्रष्टाचारी नेते : अमित शहा

वृत्तसंस्था
सोमवार, 26 मार्च 2018

''४० लाखांचे मनगटी घड्याळ वापरणारे सिद्धरामय्या हे भ्रष्ट नेते असून, त्यांच्या हातातील मनगटी घड्याळ हा त्यांच्या भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा आहे''. 

- अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

नवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जाते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ''४० लाखांचे मनगटी घड्याळ वापरणारे सिद्धरामय्या हे भ्रष्ट नेते असून, त्यांच्या हातातील मनगटी घड्याळ हा त्यांच्या भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा आहे''. 

siddaramaiah

कर्नाटकातील शिमोगा येथे आयोजित सभेत अमित शहा बोलत होते. यावेळी त्यांनी सिद्धरामय्या यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''सुपारी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे कर्नाटक सरकारने दुर्लक्ष केले. यूपीए सरकारच्या कार्यकाळात सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणीतीही नीती आखण्यात आलेली नाही. देशात सुपारीच्या पूर्ण उत्पादनाच्या तुलनेचा विचार केला, तर निम्मे उत्पादन कर्नाटकात होते. मात्र, यूपीए सरकारच्या कार्यकाळात याकडे दुर्लक्ष करण्यात आले''.

तसेच ते पुढे म्हणाले, ''मागील पाच वर्षांत कर्नाटकाचा विकास थांबला असून, सिद्धरामय्या यांचे सरकार विकासाला खिळ घालणारे सरकार आहे. आपल्या राज्याचा विकास व्हावा, अशी इच्छाच सिद्धरामय्या यांची नाही. त्यामुळेच अनेक आघाड्यांवर कर्नाटकचा विकास झालाच नाही, असेही'' ते म्हणाले. 

Web Title: Political CM Siddaramaiah Is The Corrupted Leader Says Amit Shah