कर्नाटकमध्ये नेत्यांचे "कर-नाटक'

सतीश चप्पारिके
बुधवार, 9 मे 2018

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (ता.12) मतदान होत आहे. कर्नाटकातील "कॉंग्रेस राज' संपवून विजयी मुहूर्तमेढ रोवण्यास भाजप उतावीळ झाला असला, तरी "शत प्रतिशत' विजय मिळणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या लक्षात आले आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (ता.12) मतदान होत आहे. कर्नाटकातील "कॉंग्रेस राज' संपवून विजयी मुहूर्तमेढ रोवण्यास भाजप उतावीळ झाला असला, तरी "शत प्रतिशत' विजय मिळणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या लक्षात आले आहे. 

देवेगौडांवर भाजपचे लक्ष 

उत्तर प्रदेशप्रमाणेच कर्नाटकमध्येही "मोदी कार्ड' चालणार, अशी खात्री असल्याने भाजपचे "मिशन 150+' चा नारा दिला. मात्र, निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच मोदी व शहा या जोडगोळीने भाजपचा निम्मा पराभव स्वीकारल्याचे दिसून येते. भाजपला स्वबळावर विजयाची खात्री नसल्यानेच प्रचारादरम्यान मोदी यांनी माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांच्यावर अनेकदा स्तुतिसुमने उधळली. याद्वारे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर "जेडीएस'च्या मदतीने सत्ता स्थापन करण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. मात्र, देवेगौडा व "जेडीएस'चा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असलेले एच. डी. कुमारस्वामी या पितापुत्राकडून भाजपला कसा प्रतिसाद मिळतो, यावर पुढील गणिते अवलंबून आहेत. 

"जेडीएस'चे तळ्यात की... 
भाजप व "जेडीएस'ची आघाडी करण्याबाबत एच. डी. देवेगौडा यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाची आठवण होते. ते म्हणाले होते, की जर कुमारस्वामी यांनी भाजपशी हातमिळवणी केली, तर त्यांना घरातून हाकलून देण्यात येईल. देवेगौडा त्यांच्या शब्दांना जागणार का? या सवालाचे उत्तर नाही, असेच येते. जर, सत्तास्थापनेची वेळ आलीच, तर गौडा पिता-पुत्र काही तरी नाटक सुरू करतील आणि सत्तेसाठी भाजपचा हात धरतील. यासाठी त्यांची एकच अट असेल ती म्हणजे "कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदी बसवावे.' निकालानंतर काहीही होऊ शकते, पण भाजप स्वबळावर बहुमत मिळवू शकत नाही, हे मात्र निश्‍चित आहे. 

भाजपची चुकीची पावले 
भाजपमध्ये विजयाबाबत संभ्रम आहे, याला पक्षाच्या काही चुका कारणीभूत आहेत. भाजपने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून बी. एस. येडियुरप्पा यांना पुढे आणले, ही सर्वांत पहिली चूक म्हणता येईल. कर्नाटकमधील भाजपच्या गोट्यात अंतर्गत धुसफूस असून, नेते वादग्रस्त ठरले आहेत. शेवटचे पण महत्त्वाचे खाण सम्राट रेड्‌डी बंधू यांचे सर्व गुन्हे विसरून त्यांना जवळ करणे. बळ्ळारी मतदारसंघातून रेड्डी यांच्यामुळे भाजपच्या पदरात 10 ते 15 जागा पडतील, या विश्‍वासाने पंतप्रधानांनी स्वतः रेड्डी यांना बरोबर घेतले. 

राज्याचे प्रश्‍न दुर्लक्षितच 
"प्रेम, युद्ध व राजकारणात सर्व काही माफ असते,' असे म्हटले जात असले, तरी सध्या भाजप, कॉंग्रेस व "जेडीएस' यांच्या प्रचारात राज्यातील प्रश्‍नांवर बोलले जात नाही. शेतीचा प्रश्‍न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शहरांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव, तसेच कावेरी व म्हादई पाणीप्रश्‍नांवर सर्व पक्ष गप्प आहेत. राजधानी बंगळूरमधील प्रश्‍नही दुर्लक्षितच आहेत. भाजपचे स्टार प्रचारक अमित शहा, योगी आदित्यनाथ यांची सर्व ऊर्जा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका करण्यात खर्च होत आहे. प्रत्यक्ष सभा व सर्व डिजिटल व्यासपीठावरून भाजपकडून राहुल यांनाच लक्ष्य केल्याचे दिसते. निकालानंतर आपणच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे दावे सिद्धरामय्या, येडियुरप्पा व एच. डी. कुमारस्वामी करीत आहेत. पण, कर्नाटकातील जनता सजग व परिपक्व असल्याचा अनुभव गेल्या सात दशकांपासूनचा आहे. त्यानुसार 12 मे रोजी ते योग्य भूमिका घेतीलच, तोपर्यंत राजकारण्यांचे "कर-नाटक' सुरूच राहील. 

सोशल मीडियाचा गैरवापर 
प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात भाजप सर्वांच्या पुढे आहे. कर्नाटकमध्येही सोशल मीडियावरील प्रचारात भाजपने आघाडी घेतली होती. प्रसारमाध्यमांचा वापरही नियोजनपूर्वक केला. मात्र, आता कॉंग्रेसने आश्‍चर्यकारक पद्धतीने यात मुसंडी मारली आहे. निवडणुकीच्या सभेत मोदी यांचे वाक्‍य पूर्ण होताच, कॉंग्रेसच्या डिजिटल "वॉर रूम'मधून त्यांच्या विधानांवर हल्ला चढविला जातो व "जसाश तसे' पद्धतीने उत्तर दिले जाते. या निवडणुकीत जाहीरनामापेक्षा वैयक्तिक चिखलफेकच अधिक झाल्याचे दिसते. बातम्या, लेखांमधून चुकीची माहिती पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सर्वच पक्षांनी केला. चुकीच्या बातम्या व प्रचाराच्या "भस्मासुरा'चा जन्म 2014 च्या लोकसभा निवडणुकीत झाला. त्याने आता "सत्य', "वास्तवता' व "मूल्य' यांना गिळून टाकले आहे. माध्यमांमध्येही हा "भस्मासूर' शिरलेला आहे. याचा प्रत्यय या निवडणुकीतही येत आहे. एखाद दुसरा माध्यम समूह सोडला, तर बाकी सर्व राजकीय पक्ष, नेते, उमेदवार यांना शरण गेलेले आहेत. 

 

Web Title: political drama in karnatak election