...तर कर्नाटकात पुन्हा त्रिशंकू स्थिती

वृत्तसंस्था
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

- कुमारस्वामींचे मत

- जनतेच्या हितासाठी सरकारला पाठिंबा 

बंगळूर : राज्यात मुदतपूर्व निवडणूक झाल्यास कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. पुन्हा त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. यासाठी मुदतपूर्व निवडणुकीला आमचा विरोध आहे, असे स्पष्टीकरण माजी मुख्यमंत्री व जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केले.

बंगळुरात आज प्रेस क्‍लबतर्फे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. जनतेच्या हितासाठी राज्यात कोणीही सरकार स्थापन केले तरी सद्यःस्थितीत त्यांना आपला पाठिंबा असेल, असे ते म्हणाले. कुमारस्वामी म्हणाले, "राज्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्‍यता सद्यःस्थितीत नाही. महाराष्ट्रात भाजपला चांगले वातावरण होते; परंतु तेथील परिस्थिती आता स्पष्ट झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही निवडणुकीला सामोरे गेल्यास काय होऊ शकते, याचा तुम्हीच विचार करा. राज्यातील जनतेच्या हितासाठी कुणीही सरकार स्थापन केले तरी, आमचा त्यांना पाठिंबा असेल; परंतु आम्ही सांगू त्या पद्धतीने जनतेच्या समस्यांचे निवारण झाले पाहिजे. येडियुरप्पा मुख्यमंत्री असोत किंवा सिद्धरामय्या; आमचा त्याला विरोध असणार नाही.'' 

राज्यात राष्ट्रपती राजवट आली तर पूरग्रस्तांचे काय होणार? त्यांच्या समस्यांचे निवारण करणे कसे शक्‍य आहे? यासाठी सरकार टिकवून ठेवण्यासाठी आमची साथ राहणार आहे. 2006 मध्ये देवेगौडा यांचा सल्ला मानला नाही. सरकारमध्ये 20-20 महिने अधिकार देण्याची माझी तयारी होती. ही गोष्ट सोडली तर वडिलांच्या शब्दाबाहेर मी कधीच आजवर गेलो नाही. वडिलांच्या आदेशाविरुद्ध मी कधीच वर्तन केले नाही. 2009, 2014, 2019 मधील प्रमुख घटनांमध्ये माझ्या वडिलांच्या शब्दाचा मी मान राखलेला आहे, असे कुमारस्वामी म्हणाले. 

राज्यातील सर्व 15 विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जेडीएसचे उमेदवार लढविणार आहेत. आम्ही कुणासोबतीही निवडणूक समझोता केलेला नाही. जेडीएसच्या आमदार व विधान परिषदेतील सदस्यांच्या असमाधानाबाबत मला काहीही माहीत नाही. माझ्याजवळ येऊन कुणीही याबाबत चर्चा केलेली नाही. जवळ येऊन आपले दुखणं काय आहे, हे सांगितल्याशिवाय उपचार कसे करता येतील, असा प्रश्‍न कुमारस्वामी यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Situation may Change in Karnataka