राजकारणातून उपरोध संपला - जेटली

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

लेखांच्या संकलनाचे "अंधेरे से उजाले की ओर' पुस्तक प्रकाशित
नवी दिल्ली - पाश्‍चिमात्य; विशेषतः अनेक युरोपीय देशांत राजकारण व उपरोध यांचा सुरेख संगम पहायला मिळतो. भारतीय संसदेतही मधू दंडवते, अटलबिहारी वाजपेयी, पिलू मोदी यांच्यासारख्या दिग्गजांच्या भाषणातून तो अनुभवण्यास मिळत असे. आता मात्र संसदेतील दर्जेदार भाषणांइतकाच उपरोधिक विनोदाचा शिडकावाही संपला आहे, अशी खंत राज्यसभेतील ज्येष्ठ संसदपटू व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज दिल्लीत व्यक्त केली.

जेटली यांच्या लेखांचे संकलन असलेल्या "अंधेरे से उजाले की ओर' या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते आज येथे झाले. कॉंग्रेसच्या नेत्या रिटा बहुगुणा जोशी यांच्या बहुचर्चित भाजप प्रवेशानंतर लगेचच हा कार्यक्रम झाला. संघाच्या प्रभात प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ज्येष्ठ पत्रकार स्वपन दासगुप्ता प्रमुख वक्ते होते. त्यांनी जेटली यांचे वर्णन "ल्यूटन्स झोनमध्ये घडलेला नेता' असे केले. अडवानी युगात जेटली यांनी भाजप प्रवक्ते व सरचिटणीस म्हणून पक्षासाठी सर्वांत मोठे योगदान दिले असा उल्लेख शहा यांनी केला.

जेटली यांनी आणीबाणीत झालेल्या तुरुंगवासापासूनच्या अनेक आठवणी सांगितल्या. जयप्रकाश नारायण, वाजपेयी, अडवानी व नानाजी देशमुख यांच्यासारख्या नेत्यांच्या सहवासात आपण घडलो असे सांगून ते म्हणाले, की 1973 पासूनच आपण लिहीत होतो. मात्र 17 व्या वर्षापासून राजकारण सुरू केल्यावर आजवरच्या शेकडो लेखांत एकदाही पक्षाला अवघडल्यासारखे वाटेल असा एक शब्दही मी लिहिलेला नाही याचा अभिमान वाटतो. देशातील सामाजिक परिस्थिती जशी बदलत गेली तसे प्रसार माध्यमांचे चारित्र्यही बदलत गेले. राजकीय नेत्यांची भाषणे व पक्षाचे कामकाज हेही मीडियाच निश्‍चित करू लागल्याचे दिसते. राजकीय नेत्यांना काय सांगायचे आहे ते जनतेपर्यंत जसेच्या तसे पोचणे कठीण झाले आहे. संसदेतील भाषणांतून तर उपरोध हरवलाच आहे. मात्र, तो परत येईल असा आपल्याला विश्‍वास वाटतो.

"यूपीए'च्या दशकभराच्या भ्रष्ट, अत्याचारी राजवटीत सुषमा स्वराज व जेटली यांनी संसदेतील दोन्ही सभागृहांत केलेल्या संघर्षातून 2014 च्या सत्तांतराचा पाया घातला गेला. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या राजकीय नेत्यांमध्ये मूल्यांचा ऱ्हास होत गेला. ती मूल्ये टिकविणाऱ्या मुख्य नेत्यांत जेटली यांचे नाव अग्रभागी राहील.
- अमित शहा, भाजप अध्यक्ष

Web Title: politics in delhi