महिलांसाठी राजकारण कठीणच- हतबल चिन्नम्मा भावूक

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

पत्रकारांना बंदी
अण्णा द्रमुकच्या शशिकला समर्थक आमदारांचे वास्तव्य असलेल्या "गोल्डन बे रिसॉर्ट'वर पत्रकारांना देखील जाऊ दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. अण्णा द्रमुकच्या काही कार्यकर्त्यांनी पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या. या वेळी काही पत्रकारांनी "गोल्डन बे रिसॉर्ट' बाहेर आंदोलन केले. हा रिसॉर्ट खासगी मालमत्ता असल्याने आमदार तेथे माध्यमांशी बोलणे जाणीवपूर्वक टाळत आहेत, असे एका इंग्रजी वृत्तवाहिनीने सांगितले.

चेन्नई : तमिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची ताकद दिवसेंदिवस वाढत असल्याने शशिकला यांच्या गोटात अस्वस्थता पसरू लागली आहे. आज पुन्हा समर्थक आमदारांच्या भेटीसाठी निघालेल्या शशिकला यांच्या बोलण्यातून ही बाब स्पष्ट झाली. राजकारणामध्ये महिलांना टिकाव धरणे खरोखरच कठीण असते. अम्मांना देखील या आव्हानांचा सामना करावा लागला होता. आमचा पक्ष पुढील साडेचार वर्षे माझ्या नेतृत्वाखाली राज्य करेन, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

मागील 33 वर्षे अम्मांसोबत वावरताना मला या आव्हानांचा सामना करावा लागला, ही आव्हाने माझ्यासाठी नवी नाहीत, मी कोणत्याही धमक्‍यांना घाबरत नाही, असे त्यांनी नमूद केले. एम. जी. रामचंद्रन यांच्या काळातही अशी स्थिती निर्माण झाली होती; पण जेव्हा पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आमचे ऐक्‍य अधिक मजबूत होत गेले असेही त्यांनी नमूद केले. सध्या सोशल मीडियामध्ये माझ्या नावाने एक बनावट पत्र फिरत आहे, त्यातील बनावटपणा तुम्हालाही सहज दिसेल. महिलांना राजकारण करणे किती अवघड असते याची प्रचिती यावरून येईल.

रामचंद्रन यांच्या निधनानंतर पक्षात दुही माजली तेव्हा जयललिता यांनी पक्ष सांभाळला. ज्या मंडळींनी त्या वेळी बंड केले तेच लोक आजही तसेच वागत आहेत. पक्षाचे सामान्य कार्यकर्ते माझ्यासोबत असून त्यांना चळवळीची चांगली जाणीव आहे. त्यांनी अधिक आक्रमक व्हावे मी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत असेन असेही त्यांनी सांगितले.

Web Title: politics difficult for women, emotional chinnamma