esakal | पोटनिवडणुकीत भाजपचा झेंडा; 11 राज्यातील 59 जागांचे निकाल जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

by poll election madhya pradesh gujrat uttar pradesh jharkhand

बिहार विधानसभा निवडणुकीसोबत ११ राज्यांमधील विधानसभांच्या ५९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्येही भाजपने बाजी मारली.

पोटनिवडणुकीत भाजपचा झेंडा; 11 राज्यातील 59 जागांचे निकाल जाहीर

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीसोबत ११ राज्यांमधील विधानसभांच्या ५९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्येही भाजपने बाजी मारली. 59 जागांपैकी ३९ जागा जिंकून वर्चस्व कायम राखले आहे. मध्यप्रदेशात हातचे सरकार गमावणाऱ्या काँग्रेसला पोटनिवडणुकांमध्येही सत्तावापसी करता आलेली नाही. तुलनेने ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाने आणि छत्तीसगडमध्ये सत्ताधारी काँग्रेसने आपापल्या जागा टिकवून ठेवल्या. मात्र, हरियाना आणि तेलंगणमध्ये सत्ताधाऱ्यांना या पोटनिवडणुकीमुळे धक्का बसला आहे. पोटनिवडणुकांचे निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. 

ज्योतिरादित्यांनी गड राखला
मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी २२ आमदारांसोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कमलनाथ सरकार कोसळले होते. त्यानंतर काँग्रेसच्या आणखी सहा आमदारांनी राजीनामे दिल्याने या सर्व २८ जागांवर पोटनिवडणूक झाली. विद्यमान सत्ताधारी भाजपला सत्ता टिकविण्यासाठी फक्त ८ जागांची आवश्यकता होती. परंतु जवळपास १९ जागा भाजपने जिंकल्या आहेत. अलिकडेच काँग्रेसमध्ये दिग्विजयसिंह गटाचे मानले जाणारे आणि अलिकडेच भाजपमध्ये येऊन मंत्रिपद मिळवलेले एदलसिंग कन्साना, ज्योतिरादित्य शिंदे गटाचे राज्यमंत्री गिरिराज दंडोतिया पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. काँग्रेसने ८ जागा राखून शिंदे गटाला धक्का देण्याचा प्रयत्न केला असला तरी, या निराशाजनक निकालामुळे नेतृत्वबदलाची मागणी पुढे येऊ शकते.

हे वाचा - MP Election: पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, पण ज्योतिरादित्य शिंदेंना दणका

गुजरातमध्येही भाजपचीच सरशी
गुजरातमध्येही काँग्रेस आमदार फुटून भाजपमध्ये गेल्याने आठ जागांवर निवडणुका झाल्या. या आठही जागा भाजपने खिशात घातल्या आहेत. गुजरातमध्ये संघटनात्मक ताकद वाढल्याचे दावे काँग्रेसकडून केले जात होते. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे राजीव सातव हे काँग्रेसचे गुजरात प्रभारी आहेत. मात्र येथे सत्ताधारी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावून काँग्रेसला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. कर्नाटकमध्येही दोन जागांवर मतदारांनी भाजपला कौल दिला आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारने ७ पैकी पाच जागा राखल्या आहेत. तर दोन जागा जिंकून समाजवादी पक्षाने विधानसभेतील आपले बळ वाढविले आहे.

नवीनबाबूंची जादू कायम
दुसरीकडे, झारखंडमध्ये सत्ताधारी जेएमएम काँग्रेस आघाडीने दोन्ही जागा जिंकल्या आहेत. ओडिशामध्ये देखील नवीनबाबूंची जादू अजूनही कायम असल्याचे दिसून आले आहे. बिजू जनता दलाने येथील दोन्हीही जागा आपल्याकडेच राखल्या आहेत. मणिपूरमध्ये पाच पैकी भाजपने चार जागा खिशात घालून ईशान्य भारतातही आपली पकड मजबूत असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेजारच्याच नागलॅन्डमध्ये अपक्षांनी दोन्हीही जागा जिंकल्या आहेत.

हे वाचा - Bihar Election: भाजपचे 5 डावपेच ठरले यशस्वी; JDUला टाकले मागे

छत्तीसगड – ०१ जागा - काँग्रेस विजयी
गुजरात - ८ जागा - सर्व जागांवर भाजप विजयी
हरियाना - १ जागा - काँग्रेस विजयी
झारखंड - २ जागा - काँग्रेस आणि जेएमएम विजयी
कर्नाटक – २ जागा - दोन्ही जागांवर भाजप विजयी
मध्यप्रदेश - २८ जागा - भाजप १९, बसप १, काँग्रेस ८
मणिपूर – ५ जागा - भाजप ४, अपक्ष १
नागालॅन्ड – २ जागा - अपक्ष विजयी
ओडिशा - ०२ – जागा - दोन्हींवर बिजू जनता दलाचे वर्चस्व
तेलंगण - ०१ जागा – भाजप विजयी
उत्तर प्रदेश – ०७ जागा - भाजप ०५, समाजवादी पक्ष २ जागांवर विजयी

योगेश्‍वर दत्त ‘चीत’
हरियानामध्ये मात्र मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला विधानसभा पोटनिवडणुकीत आपली एक जागा गमवावी लागली आहे. प्रसिद्ध कुस्तीपटू योगेश्वर दत्त हे बरोदा मतदार संघात भाजपचे उमेदवार होते. त्यांना काँग्रेसच्या उमेदवाराने चीत केले आहे. छत्तीसगडमध्ये एका जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने विजय मिळवला. परंतु, तेलंगाणामध्ये मात्र के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील तेलंगाण राष्ट्र समितीला झटका लागला आहे. विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवला.

दरम्यान, बिहारच्या वाक्मीकीनगर लोकसभा मतदार संघाचीही पोटनिवडणूक झाली होती. येथेही नितीशकुमार यांचा करिष्मा कायम राहिला असून ‘जदयू’च्या उमेदवाराने काँग्रेसचा पराभव केला आहे.