पोटनिवडणूकीत भाजपची पिछेहाट; भाजपला केवळ दोन जागांवर आघाडी

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

देशातील विविध राज्यातील लोकसभेच्या चार व विधानसभेच्या दहा जागांसाठी पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. पण सुरवात बघता भारतीय जनता पक्षासाठी ही मतमोजणी फारशी आनंदाची नाही, कारण 14 जागांपैकी केवळ दोनच जागांवर भाजप आघाडीवर आहे.

नवी दिल्ली : आज (ता. 31) देशातील विविध राज्यातील लोकसभेच्या चार व विधानसभेच्या दहा जागांसाठी पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. पण सुरवात बघता भारतीय जनता पक्षासाठी ही मतमोजणी फारशी आनंदाची नाही, कारण 14 जागांपैकी केवळ दोनच जागांवर भाजप आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात असलेल्या कैराना लोकसभा मतदारसंघात पूर्वी भाजपचे वर्चस्व होते, पण अनपेक्षितपणे तेथे राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सूम हसन या आघाडीवर आहेत व त्यांना काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांचा पाठिंबा आहे.

विविध राज्यातील मतमोजणीचा घेतलेला आढावा :
उत्तर प्रदेश -
उत्तर प्रदेशात 1 लोकसभा व एक विधानसभा जागांसाठी मतमोजणी होत आहे. कैराना येथे होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मागे टाकत अजितसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या तबस्सूम हसन यांनी आघाडी मिळवली आहे. सुरवातीलाच तबस्सूम हसन यांनी 35 हजारहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे. तर नुरपूर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टी आघाडीवर आहे. या दोनही जागा आधी भाजपकडे होत्या. या दोन्ही आघाडी म्हणजे भाजपला मोठा धक्का असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी निराशाजनक बाब आहे.  

महाराष्ट्र -
महाराष्ट्रातील पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राजेंद्र गावीत आघाडीवर आहे, तर गोंदीया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. या पूर्वी या दोनही जागांवर भाजपचे वर्चस्व होते. 

बिहार -
बिहारच्या जोकीहाट विधानसभा मतदारसंघात भाजप-जेडीयु या युतीला मागे टाकत राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर जनता दल युनायटेडचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर आहेत. 

झारखंड -
झारखंडमधील गोमिया विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माधवलाल सिंह आघाडीवर असून आजसूचे डॉ. लंबोदर महतो दुसऱ्या स्थानावर आहे. तर सिल्ली विधानसभा मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार आघाजीवर आहेत. 

उत्तराखंड -
उत्तराखंडच्या थराली विधानसभा मतदारसंघात सत्तारूढ पक्ष भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. 

पश्चिम बंगाल -
पश्चिम बंगालच्या महेशताला विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे, तर भाजप दुसऱ्या व वामदल तिसऱ्या स्थानावर आहेत.

पंजाब - 
पंजाबच्या शाहकोट विधानसभा मतदारसंघात भाजपला मागे टाकत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. 

केरळ -
केरळमधील चेंगनुर विधानसभा मतदारसंघात सात्तारूढ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया आघाडीवर आहे. 

नागालँड -
नागालँडच्या एकमेव लोकसभा मतदारसंघात नॅशनलिस्ट डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव पार्टीचे टोकेहो हे आघाडीवर आहेत. 

पोटनिवडणूकीतील विजयी उमेदवार व पक्ष :
कर्नाटक - 

कर्नाटकातील आरआर नगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे मूनीराथन् यांनी भाजपला पराभूत करून 40,000 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

मेघालय -
मेघालयच्या अमपती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे मियानी डी शेरा विजयी झाले आहेत.
 

Web Title: by poll results bjp in front on only 2 seats from 14 seats