पारंपरिक इंधन टाळल्यास प्रदूषणात घट 

pollution
pollution

नवी दिल्ली : स्वयंपाकासाठी वापरले जाणारे लाकूड, गोवऱ्या, कोळसा आणि केरोसिन (रॉकेल) यांच्या ज्वलनामुळे होणारे उत्सर्जन कमी केल्यास हवेच्या प्रदूषणात घट करण्यास भारताला मोठे यश मिळू शकेल, असा दावा नव्या अभ्यासातून पुढे आला आहे. एवढेच नव्हे तर या जैव इंधनाचा वापर घटल्यास दरवर्षी दोन लाख 70 हजार जणांचे प्राण वाचवता येऊ शकतात, असा निष्कर्ष आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आला आहे. 

उद्योग आणि वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनात काहीही बदल झाले नाहीत तरी स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनातून, म्हणजेच लाकूड, गोवऱ्या, कोळसा आणि केरोसिन आदींच्या ज्वलनातून होणारे उत्सर्जन कमी केल्यास हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते, असे आयआयटी दिल्लीतील संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. स्वयंपाकासाठीच्या लाकूड, कोळसा, गोवऱ्या आणि केरोसिन आदींच्या ज्वलनातून होणाऱ्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी केल्यास देशातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात वाढविता येऊ शकेल, असा दावाही संशोधकांनी केला आहे. राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या जर्नलमध्ये या अभ्यासाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. 

स्वयंपाकगृहात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक इंधनाचा वापर कमी केल्यास हवेच्या प्रदूषणामुळे देशात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंमध्ये 13 टक्‍क्‍यांची घट होऊ शकते, असेही या अभ्यासातून दिसून येते, अशी माहिती आयआयटी दिल्लीतील संशोधकांच्या पथकातील सागनीक डे यांनी दिली. 

हवेची गुणवत्ता सुधारणार 
भारतातील हवेच्या प्रदूषणासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरणाऱ्या स्रोतांमध्ये स्वयंपाक घरातील पारंपरिक इंधनाचा समावेश होतो. स्वयंपाकासाठी होणारा पारंपरिक इंधनाचा वापर थांबविल्यास भारतातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत होऊ शकते. या मार्गाने देशातील हवेच्या प्रदूषणाचा स्तर राष्ट्रीय मानकांएवढा आणता येऊ शकतो, असा दावा अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राधापक किर्क आर. स्मिथ यांनी केला आहे. 

वीज, गॅस सिलिंडरचा तुटवडा 
2016च्या आकडेवारीनुसार भारतातील निम्मी लोकसंख्या अद्यापही स्वयंपाकासाठी जैविक इंधनावर अवलंबून असल्याचे दिसून येते. भारतातील ग्रामीण भागामध्ये आजही वीज आणि स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून येतो. त्यामुळे ग्रामीण भागात जैविक इंधनाच्या होणाऱ्या वापरामुळे हवेच्या प्रदूषणात मोठी भर पडते, असा दावा संशोधकांनी केला आहे. आजही देशातील ग्रामीण भागात लाकूड, गोवऱ्या, शेतातील पिकांचे अवशेष आदींचा स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. वीज नसल्यामुळे रात्रीच्या वेळी उजेडासाठी केरोसीनचा वापरही भारतात प्रचंड प्रमाणात होतो. त्यामुळे हा वापर जर थांबविण्यात आला किंवा कमी करण्यात आला, तर हवेचे प्रदूषण कमी होऊ शकते, असे मत संशोधकांनी नोंदविले आहे. 

निम्मी लोकसंख्या जैव इंधनावर अवलंबून 
- लाकडाच्या धुरात तंबाखूच्या धुराप्रमाणेच सुमारे 300 प्रकारचे हानिकारक रासायनिक घटक असतात 
- देशातील निम्मी लोकसंख्या घरांमध्ये जैव इंधनावर अवलंबून आहे 
- लाकूड, गोवऱ्या, कोळसा, केरोसीनच्या ज्वलनातून निर्माण होणारे हानिकारक वायू आणि इतर घटक फुफ्फुसाचा दाह, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग अशा आजारांसाठी कारणीभूत ठरतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com