हवाई संरक्षण यंत्रणा सीमेजवळ हलविण्याचा भारताचा निर्णय 

हवाई संरक्षण यंत्रणा सीमेजवळ हलविण्याचा भारताचा निर्णय 

नवी दिल्ली ः भारत-पाकिस्तानमध्ये अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कराने सुरक्षाव्यवस्थेचा अंतर्गत आढावा घेतला असून, पाकिस्तानकडून होणारा संभाव्य हवाई हल्ला सीमेजवळच उधळून लावण्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून भारत-पाकिस्तान सीमेजवळ हवाई संरक्षण यंत्रणेचे (एअर डिफेन्स सिस्टिम) काही युनिट तैनात करण्याची योजना आखली असल्याची माहिती लष्करातील वरिष्ठ पातळीवरील सूत्रांनी दिली. 

हवाई संरक्षण यंत्रणेसह इतरही संरक्षणात्मक यंत्रणांची संख्या भारत-पाकिस्तान सीमेजवळच्या भागात वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे शत्रूकडून करण्यात आलेल्या संभाव्य हवाई हल्ला सीमेजवळच उधळून लावणे शक्‍य होणार आहे. त्यासाठी हवाई संरक्षण यंत्रणेची काही युनिट सीमेजवळच्या भागात तैनात करण्याचे लष्कराचे नियोजन आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी सांगितले, की जम्मू आणि काश्‍मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमध्ये तैनात असलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या युनिटच्या ठिकाणांचा हवाई दलाकडून आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार हवाई संरक्षण यंत्रणेचे काही युनिट सीमेच्या अधिक जवळच्या भागांमध्ये हलविण्यात येणार आहेत. 

भारतीय हवाई दलाच्या विमानांनी आक्रमक प्रत्युत्तर दिल्यामुळे पाकिस्तानी विमाने काही किलोमीटरच भारतीय हद्दीत येऊ शकली होती. भारतीय हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून त्याच्या दुसऱ्या दिवशी, 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानकडून हवाई हल्ला करण्यात आला होता. 

आकाश क्षेपणास्त्र अन्‌ रशियन "क्वाड्राट' 
भारतीय लष्कराकडे असलेल्या हवाई संरक्षण यंत्रणेमध्ये भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्रांसह रशियन बनावटीच्या क्वाड्राट आणि इतरही काही जुन्या संरक्षण आयुधांचा समावेश आहे. "डीआरडीओ' आणि इस्त्राईलची संयुक्त निर्मिती असलेली एमआर-एसएएम ही नवी हवाई संरक्षण यंत्रणाही लवकरच दाखल होणार आहे.

...तर पाकचे अधिक नुकसान झाले असते 
पाकिस्तानातील बालाकोटजवळ जैशे-महंमद या दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून शेजारील देशाने नियंत्रण रेषेलगतच्या जम्मू सेक्‍टरमध्ये मोठा हवाई हल्ला केला होता. हा हल्ला हवाई दलाच्या मिग-21 आणि सुखोई-30एमकेआय या लढाऊ विमानांनी परतावून लावला. त्या वेळी पाकिस्ताचे एक "एफ-16' विमानही पाडण्यात आले होते. मात्र, या घटनेनंतर असा निष्कर्ष काढण्यात आला आहे, की सीमेलगतच्या भागात हवाई संरक्षण यंत्रणेची युनिट तैनात असती, तर पाकिस्तानचे अधिक नुकसान करता आले असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com