राहुल गांधी नको? मग ज्योतिरादित्य शिंदेंना करा अध्यक्ष!

वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

काँग्रेसमधील नेतृत्त्वाच्या गोंधळामध्ये आज (सोमवार) आणखी भर पडली. नुकताच सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलेले ज्योतिरादित्य शिंदे यांना आता काँग्रेसचे अध्यक्ष करा, अशी मागणी आता मध्य प्रदेशमधून पुढे येऊ लागली आहे. 

भोपाळ : काँग्रेसमधील नेतृत्त्वाच्या गोंधळामध्ये आज (सोमवार) आणखी भर पडली. नुकताच सरचिटणीसपदाचा राजीनामा दिलेले ज्योतिरादित्य शिंदे यांना आता काँग्रेसचे अध्यक्ष करा, अशी मागणी आता मध्य प्रदेशमधून पुढे येऊ लागली आहे. 

लोकसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊ केला आहे. अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसला, तरीही राहुल मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. 

या पार्श्‍वभूमीवर आज (सोमवार) भोपाळमधील काँग्रेस कार्यालयासमोर ज्योतिरादित्य यांच्या समर्थकांनी काही फलक झळकाविले आहेत. 'ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करावे', अशी मागणी या फलकांद्वारे करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांच्याकडे पक्षाची जबाबदारी सोपविली जाणार, अशाही चर्चा गेल्या आठवड्यात राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र, त्यांनी स्वत:च ही बातमी फेटाळली. 

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामे दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Posters in Bhopal to make Jyotiraditya Scindia Congress President