काश्मीरमध्ये दोन महिन्यांनी रिंग वाजली

वृत्तसंस्था
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

काश्मीर खोऱ्यात आज दुपारी बारा वाजल्यापासून मोबाईल पोस्टपेड सेवा कार्यान्वित झाली आहे. जम्मू काश्‍मीरचे मुख्य सचिव आणि प्रवक्ते रोहित कन्सल यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात सुमारे 40 लाख पोस्टपेड मोबाईलधारक आहेत.

श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी आज (सोमवार) पुन्हा एकदा रिंग वाजली. 

काश्मीर खोऱ्यात आज दुपारी बारा वाजल्यापासून मोबाईल पोस्टपेड सेवा कार्यान्वित झाली आहे. जम्मू काश्‍मीरचे मुख्य सचिव आणि प्रवक्ते रोहित कन्सल यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात सुमारे 40 लाख पोस्टपेड मोबाईलधारक आहेत. मात्र, इंटरनेट आणि प्रीपेड मोबाईलची सेवा अद्याप बंदच राहणार आहे. 

5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्‍मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर तब्बल 69 दिवसांनंतर मोबाईल सेवा सुरवात झाली आहे. काश्‍मीर खोऱ्यात एकूण 66 लाख मोबाईलधारक असून, त्यापैकी 40 लाख पोस्टपेड मोबाईलधारक आहेत. जम्मू काश्‍मीरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर मोबाईल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे कन्सल यांनी सांगितले. हा निर्णय राज्यातील सर्व दहा जिल्ह्यांना लागू असणार आहे. जम्मू-काश्‍मीर प्रशासनाने नुकतीच पर्यटकांवरची बंदी हटविली असून, शाळा आणि महाविद्यालयेही सुरू केली आहेत. मात्र, शैक्षणिक संस्थांत उपस्थिती खूपच नगण्य दिसून येत आहे. मोबाईल सेवा सुरू झाल्याने पर्यटक राज्यातील कोणत्याही भागातून घरी संपर्क करू शकतील, काश्‍मीर खोऱ्यातील विद्यार्थीही पालकांच्या संपर्कात राहू शकतील आणि व्यावसायिकही ग्राहकांशी संवाद करू शकतील, असे कन्सल म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Postpaid mobile services resume in Srinagar