गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

"कायद्याच्या कचाट्यात सापडाल'
बेकायदा पैसे साठवलेल्या लोकांना तुमच्या जन- धन खात्याचा गैरवापर करू देऊ नका. यामुळे तुम्ही विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकाल,' असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना दिला. नोटाबंदीच्या निर्णयाचा सामान्य जनतेलाच फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आग्रा : "भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्षे पूर्ण होतील, त्या वेळी देशातील प्रत्येक गरिबाकडे स्वत:चे घर असायला हवे,' असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजनेची सुरवात करत असल्याचे जाहीर केले. याशिवाय मोदींनी अकराशे कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचेही उद्‌घाटन केले.

आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच पंतप्रधान मोदींनी कानपूरजवळ झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. यानंतर गरिबांना त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करता यावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना सुरू केल्याचे मोदी म्हणाले. ते म्हणाले,""प्रत्येक राज्यातील लोकांच्या राहणीमानानुसार घरांची रचना करण्यात येणार आहे. गरिबांना केवळ चार भिंती दिल्या जाणार नसून त्यांना ते घर वाटेल, अशीच ही रचना असेल. या घरांमध्ये वीज आणि गॅस जोडणी असेल. अशा कोट्यवधी घरांची सध्या आवश्‍यकता असून, त्यासाठी हजारो बांधकाम मजुरांची आवश्‍यकता आहे. यासाठी युवकांना प्रशिक्षण देण्याचा सरकारची योजना असून, त्यामुळे बेरोजगारांना कामही मिळणार आहे.''

केंद्र सरकार गरिबांसाठीच काम करत असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी या वेळी केला. गरिबांसाठीच सरकारने जन-धन योजना, उज्ज्वला योजना आणि इतर अनेक योजना सुरू केल्याचे मोदींनी सांगितले. देशातील 1800 गावांमध्ये मागील 70 वर्षांमध्ये वीज पोचली नसून, केंद्र सरकार आगामी एका वर्षात तेथे वीज पोचवेल, असे म्हणत त्यांनी पूर्वीच्या सरकारवर टीका केली.

"कायद्याच्या कचाट्यात सापडाल'
बेकायदा पैसे साठवलेल्या लोकांना तुमच्या जन- धन खात्याचा गैरवापर करू देऊ नका. यामुळे तुम्ही विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकाल,' असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना दिला. नोटाबंदीच्या निर्णयाचा सामान्य जनतेलाच फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. "या देशातील प्रामाणिक नागरिकांना मी प्रणाम करतो आणि माझ्या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सध्या अनेक सामान्य व्यक्तींना त्रास होत असला तरी तो त्रास वाया जाऊ देणार नाही. या निर्णयाचा फटका बसलेले नेतेच सर्वाधिक विरोध करत आहेत,' असेही मोदी म्हणाले.

रेल्वे मंत्रालयाला सूचना
कानपूर येथील अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करणाऱ्या पंतप्रधान मोदींनी, अपघातविरहित रेल्वेसेवेचे लक्ष्य समोर ठेवून काम करण्याच्या सूचना मंत्रालयाला दिल्याचे सांगितले. मोदी यांनी एका रेल्वे प्रदर्शनाला भेट देत या मंत्रालयाने केलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. रेल्वेने तयार केलेला नाइट व्हिजन कॅमेरा, वेगवान प्रवासासाठी कॅटरपिलर ट्रेन, वॉटर व्हेंडिंग मशिन, अन्न गरम ठेवण्यासाठी फूड बॉक्‍स, सौर आणि पवन ऊर्जेचा वापर असे प्रकल्प रेल्वे राबविणार आहे.

Web Title: pradhanmantri awas yojana