दिल की 'राहत'! 'दो गज जमीं' के 'जमीनदार'

राहत आता आपल्यात नाहीत. ते आता 'दो गज जमीं' के 'जमीनदार' झाले आहेत. इंदूरच्याच जमिनीत आता ते कायमचा विसावा घेतील. 

दो गज सही मगर ये मेरी मिल्कियत तो है
ऐ मौत, तू ने मुजे जमींदार कर दिया...

'जमीनदार' होण्यासाठी मृत्यू यावा लागतो तर! 
होय, पचत-पटत नसलं तरी हे सत्य आहे. सर्वसामान्यांच्या बाबतीत तर आहेच आहे! आणि आयुष्यभर सर्वसामान्यांसाठीच गझला लिहिणारे राहत कुरैशी अर्थात् राहत इंदौरी यांच्या लेखणीतून असा शेर लिहिला गेल्यास नवल ते काय? तो त्यांनी लिहिला नसता तरच ते आश्चर्य ठरलं असतं. या शेरातून त्यांनी एक दाहक सत्यच अतिदाहक शब्दांत मांडलं आहे.

राहत आता आपल्यात नाहीत. ते आता 'दो गज जमीं' के 'जमीनदार' झाले आहेत. इंदूरच्याच जमिनीत आता ते कायमचा विसावा घेतील. इंदूरला जन्मले म्हणून इंदौरी. आपल्या गावाचं नाव आपल्या कविनामात गुंफण्याची फार जुनी परंपरा उर्दू गझलविश्वात आहे. त्यानुसार राहत कुरैशीचे झाले राहत इंदौरी. मराठीत इंदूर, हिंदीत इंदौर. राहत म्हणजे सुख, आनंद, आराम, विसावा... 

राहत हे कमालीचे लोकप्रिय कवी होते हे निःसंशय! सोशल मीडियावरचं त्यांचं लाखोंच्या घरातलं फॅनफॉलोइंगच तसं सांगतंय! अर्थात्, हे झालं लोकप्रियता मोजण्याचं आजच्या काळातलं परिमाण...पण सोशल मीडिया नव्हता तेव्हाही त्यांची लोकप्रियता तेवढीच होती. राहत हे खऱ्या अर्थान 'मुशायरे का शायर' होते. त्यांचा सहभाग असलेला प्रत्येक मुशायरा ते जिंकायचेच.

लोकप्रियता हाच काही दर्जाचा एकमेव निकष ठरू शकत नाही, हे जरी खरं असलं तरी, लोकप्रिय होण्यासाठी लेखनात, सादरीकरणात जे जे गुण आवश्यक असतात ते ते सगळे गुण राहत यांच्याकडे होते. 

सर्वसामान्यांच्या हृदयाला हात घालत विद्यमान राजकीय-सामाजिक परिस्थितीवरचं परखड-सडेतोड भाष्य साभिनय सादर करणं ही राहत यांची खासियत होती. सत्तेला, सत्ताधाऱ्यांना ते आपल्या शेरांतून मार्मिक प्रश्न विचारत. असे प्रश्न विचारताना समोर उपस्थित असलेल्या श्रोत्यांनाही ते त्यात सहभागी करून घेत. त्यामुळे साहजिकच एक सळसळता 'माहौल' आपोआपच तयार होई.

Image

'लोकानुनयाची चटक लागलेला कवी,' 'सवंगतेकडे झुकलेला कवी' अशी टीकाही राहत यांच्यावर अनेकदा झाली; पण त्या टीकेकडे दुर्लक्ष करत 'सत्य-असत्यासी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता' या सूत्रानुसार, मनाचा कौल जे सांगेल ते आणि तसंच ते लिहीत राहिले. त्यांच्या गझलेचं तेच बलस्थान होतं. लोकांच्या मनातलं लिहिणं!

सभी का खून है शामिल यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिंदोस्तान थोडी है?

हा राहत यांचा शेर गेल्या काही महिन्यांत खूप म्हणजे खूपच गाजला. वादग्रस्तही ठरला...मात्र, ठराविक श्रोतृवर्गाकडून ह्या शेराला मोठीच दाद मिळायची. ती पाहून, 'श्रोत्याच्या मनातलं लिहिणारा कवी' या बिरुदालाच जणू ते जागत आहेत, असं वाटावं! 
हिंदुस्थान हा काही कुणा एकाचा किंवा कुणा एकाच्याच बापाचा नाही, असं काहीसं सकृद्दर्शनी अंगावर येणारं, प्रसंगी सवंगही वाटू शकणारं, असभ्यतेचं वाटणारं काव्य लिहिणारे राहत आपली कमालीची देशभक्तीही तितक्याच उत्कटतेनं प्रकट करताना एके ठिकाणी असंही लिहून जातात :

मैं जब मर जाऊं तो मेरी अलग पहचान लिख देना
लहू से मेरी पेशानी पर हिंदुस्तान लिख देना

अगदी सच्चा कवीला साजेशी अशीच ही इच्छा आणि अशीच ही देशभक्ती!
जगजितसिंग यांनी गायिलेली एक रचना गझलरसिकांच्या परिचयाची असेल. 

दोस्ती जब किसी से की जाए
दुश्मनों की भी राए ली जाए

म्हणजे, ' हा माणूस मैत्री करण्यायोग्य आहे का,' असं जर का कुणाला विचारायचं असेल तर ते भलत्यासलत्याला विचारण्यापेक्षा त्या माणसाच्या शत्रुलाच थेट विचारावं!( शत्रूही सांगेल की 'होय, करा त्या माणसाशी मैत्री. माझा शत्रू असेलही तो; पण मनानं सच्चा आहे अगदी'!) 

हा खुबीदार शेर असलेली ही गझल आहे राहत यांचीच. मैत्रीची परिभाषाच बदलून टाकणारी ही विचारसरणी!

जनाज़े पर मिरे लिख देना यारो
मोहब्बत करने वाला जा रहा है 

असं 'टीनेजरी' वयात आवडणारं प्रेमाचं नाजूक काव्य जितक्या हळुवारपणे राहत यांच्याकडून लिहिलं गेलं, तितक्याच जोरकसपणे विद्रोहाचं, बंडखोरीचंही काव्य राहत यांनी लिहिलं; किंबहुना 'बगावती शायर' हीच त्यांची ठळठळीत प्रतिमा त्यांच्या चाहत्यांच्या मनात आहे. बंडखोरी तरुणांना आवडतेच. त्या वयात ती त्यांच्या रक्तातच असते. तरुणांची हीच 'नस' राहत यांनी नेमकी ओळखली होती. त्याअर्थानं नेमकं सांगायचं तर राहत हे 'तरुणांचे कवी' होते. राहत याचे किती तरी शेर म्हणी-वाक्प्रचारांचं रूप घेऊन तरुणांच्या ओठांवर रुळलेले आहेत. मुशायऱ्यांमध्ये त्यांच्या ठरावीक शेरांना तरुणवर्गाकडून अशी काही दाद मिळत असे की विचारू नये!

ये बूढ़ी क़ब्रें तुम्हें कुछ नहीं बताएंगी
मुझे तलाश करो दोस्तो यहीं हूँ मैं

असा आत्मविश्वास त्यांच्या ठाई होता तो उगाच नव्हे!
लोकभाषेचा, म्हणींचा, वाक्प्रचारांचा चपखल वापर हे राहत यांच्या गझलांचं वैशिष्ट्य होतं. गझलरचनेतली सफाई तर वाखाणण्याजोगीच होती. प्रतिमा-प्रतीके-रूपके यांचा नेमका आणि आधुनिकतेशी सुसंगत असा वापर हाही त्यांच्या गझललेखनाचा आणखी एक विशेष सांगता येईल.

Image

हिंदी चित्रपटसृष्टीत गीतलेखन करणं हा खरं तर राहत यांच्यासारख्या मनस्वी कवीचा पिंड नव्हता...पण त्यांनी तेही केलं. 'तद्दन फिल्मी' गाण्यांमधली काव्यमयता जपत! मात्र, सतत दुसऱ्याच्या तालावर नाचावं लागणाऱ्या त्या झगमगाटी दुनियेत हा मनस्वी कवी फार काळ रमला नाही. ते साहजिकच होतं.

सरलेल्या दिवसाचा फारसा विचार न करता आलेला प्रत्येक दिवस परिपूर्णतेनं जगणं हे मनस्वी माणसाचं लक्षण असतं. त्यातही तो कवी असेल तर हे मनस्वीपण अधिकच गडद-गहिरं होतं. राहत असंच जगले. रसरशीत. चैतन्यदायी. जिवंत. सळसळतं. 
अशा या मनस्वी कवीचा शेर आहे. 

बुलाती है मगर जाने का नईं
ये दुनिया है, उधर जाने का नईं

'जाने का नईं' असं ते त्यांच्या खास शैलीत म्हणाले असले तरी ती (मौत) बोलावत असेल तर त्या (अज्ञाताच्या) दुनियेत सगळ्यांना एक ना एक दिवस जावंच लागतं... राहत हे अशाच अज्ञाताच्या दुनियेत कायमचे निघून गेले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pradip kulkarni write blog on rahat indori