Loksabha 2019 : प्रज्ञासिंह यांना उमेदवारी हे कट्टरतावादाचे प्रतीक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीला आता माजी सनदी अधिकाऱ्यांनीच विरोध केला आहे.

नवी दिल्ली (पीटीआय) : मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांशी सामना करताना हुतात्मा झालेले पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपच्या नेत्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या उमेदवारीला आता माजी सनदी अधिकाऱ्यांनीच विरोध केला आहे.

देशभरातील तब्बल 70 माजी सनदी अधिकाऱ्यांनी प्रज्ञासिंह यांना खुले पत्र लिहिले आहे. मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी असणाऱ्या प्रज्ञासिंह ठाकूर या वैद्यकीय कारणांमुळे तुरुंगाच्या बाहेर असून, त्या आता भोपाळमधून भाजपच्या उमेदवार आहेत. प्रज्ञासिंह यांची उमेदवारी केवळ कट्टरतावादाचेच प्रतीक नसून तो हुतात्मा करकरे यांच्या स्मृतींचा अवमान करण्यासारखे आहे, अशी खंत या अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. 

मागील आठवड्यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आपल्या शापामुळे करकरे मरण पावल्याचा दावा केल्याने खळबळ निर्माण झाली होती. त्यांच्या या विधानाचा देशभरातील विविध घटकांनी निषेध केला होता. पुढे भाजपनेही हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच हात झटकले होते. माजी अधिकाऱ्यांच्या पत्रावर पंजाबचे माजी पोलिस महासंचालक ज्युलिओ रिबेरे, पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर आणि प्रसारभारतीचे माजी सीईओ जवाहर सरकार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Web Title: Pragya Singhs candidature is a symbol of fanaticism