मोदी सरकारच्या 100 दिवसांबद्दल जावडेकर काय म्हणाले पाहा

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 8 September 2019

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकालाला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या शंभर दिवसांतील सरकारच्या कामगिरीची माहिती दिली.

नवी दिल्ली : 'सध्याचे आर्थिक मंदीसदृश वातावरण ही कोणत्याही अर्थव्यवस्थेसमोर ठराविक काळाने येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. देशातील अर्थव्यवस्थेचा पाया भक्कम असल्याने परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल व पाच ट्रिलियन डॉलर अर्थसत्तेचे लक्ष्य देश निश्‍चित साध्य करेल,' असा आत्मविश्‍वास व्यक्त करून मोदी सरकारने आपल्या शंभर दिवसांच्या पुढील वाटचालीला सुरवात केली. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'कठोर परिश्रम व मोठ्या, दूरगामी निर्णयांचे 100 दिवस' असे या कालावधीचे वर्णन केले. 

- राज्यातील शाळांना उद्या सुट्टी!

केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकालाला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या शंभर दिवसांतील सरकारच्या कामगिरीची माहिती दिली. जगभरात मंदी असली तरी भारताला त्याच्या झळा जाणवणार नाहीत, असा विश्‍वास जावडेकर यांनी व्यक्त केला. प्लॅस्टिकबंदीचा संकल्प, कलम 370 रद्द करणे, आयुष्मान भारत, शेतकऱ्यांसाठी वार्षिक सहा हजारांची थेट मदत, घरोघर पाणी, जलशक्ती, उज्वला आदी निर्णयांची जंत्री सादर करताना जावडेकर यांनी पत्रकारांसमोर सादरीकरणही केले. 

यंदाच्या अधिवेशनात लोकसभा व राज्यसभेचे कामकाज समाधानकारक चालले व 35-35 विधेयके मंजूर झाली हे मोदी सरकारच्या सुशासनाचे फळ आहे. भ्रष्टाचार बिलकूल सहन केला जाणार नाही, हे पहिल्या 100 दिवसांत दीडशेहून अधिक अधिकाऱ्यांना कायमचे घरी बसवून सरकारने सिद्ध के ले आहे, असेही जावडेकर म्हणाले. 

परिणामांची जाणीव आहे म्हणून... 
मोटार वाहन कायद्यातील तरतुदी कठोर आहेत, त्यामागे देशवासीय लवकरच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करू लागतील व दंड करण्याची वेळच येणार नाही, असा विश्‍वास असल्याचे प्रकाश जावडेकर म्हणाले. 'आम्ही पाश्‍चात्य देशातील वाहतूक नियम पालनाचे कौतुक करतो. पण युरोप-अमेरिकेत काही संत जन्माला येत नाहीत. जे वाहतूक नियम तोडतात त्यांना त्याच्या गंभीर परिणामांची योग्य जाणीव झालेली असते म्हणून ते नियम पाळतात,' असा दावा त्यांनी केला. 

- ईशान्येतील Article 371 ला हात लावणार नाही : अमित शहा​

राहुल यांची खिल्ली 
'मोदीजींच्या नेतृत्वाखाली' या शब्दांनी आपल्या प्रत्येक वाक्‍याची सुरवात करणाऱ्या प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेची मात्र मनसोक्त खिल्ली उडविली. ते म्हणाले की, या 100 दिवसांतले 90 दिवस ज्यांचा ठावठिकाणा कोणाला माहिती नव्हता, त्यांनी केलेल्या टीकेवर काही बोलण्यासारखे नाही. मोदी शासनाच्या कामकाजाची ही गती काँग्रेसला नवीन असावी त्याच हताशेतून त्यांची टीका येत आहे.

Image may contain: 1 person, beard and text


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Javadekar comment about 100 days of Modi government