राजकारणातील चाणक्‍य 'भारतरत्नां'च्या रांगेत 

Pranab Mukherjee
Pranab Mukherjee

देशाच्या समाज आणि अर्थकारणावर तब्बल पाच दशके प्रभाव टाकणारे प्रणव मुखर्जी राजकीय नेते म्हणून तर यशस्वी ठरलेच; पण त्याचबरोबर त्यांनी विचारवंत म्हणूनही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. सखोल अभ्यास, संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आणि राजतंत्राचे जाणकार असणारे ऋषितुल्य प्रणवदा सर्वपक्षीय नेत्यांसाठी मार्गदर्शक चाणक्‍य ठरले. आता त्यांचा भारतरत्नांच्या यादीत समावेश झाला आहे. 

राजकीय वाटचाल 
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1969 मध्ये प्रणवदांना राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांना सक्रिय राजकारणात आणले. प्रणवदा अल्पावधीत इंदिराजींचे विश्‍वासू सहकारी बनले आणि 1973 मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थानही मिळाले. अर्थमंत्री म्हणून 1982 ते 84 आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून 1980 ते 1985 या काळामध्ये त्यांनी लक्षवेधी कामगिरी बजावली. इंदिरा गांधी यांची 1984 मध्ये हत्या झाल्यानंतर मुखर्जी हेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील मुख्य दावेदार होते. राजीव गांधी यांना पुरेसा अनुभव नसल्याने देशाचे पंतप्रधानपद प्रणवदांनाच मिळणार, अशी स्थिती होती; पण येथे नियतीने राजीव गांधी यांच्या बाजूने कौल दिला आणि त्यांचे पंतप्रधानपद हुकले. राजीवजींच्या काळात प्रणवदांना काहीकाळ राजकीय विजनवास सहन करावा लागला. कॉंग्रेसमधील सत्तासंघर्षाला वैतागून शेवटी त्यांनी राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेसची वेगळी चूल मांडली. पुढे राजीव गांधींशी मतैक्‍य झाल्यानंतर त्यांनी हा पक्ष 1989 मध्ये कॉंग्रेसमध्ये विलीन केला.

राजीव गांधी यांची 1991 मध्ये हत्या झाली आणि देशाचे राजकारण वेगळ्या वळणावर गेले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी मुखर्जींना 1991 मध्ये नियोजन आयोगाचे प्रमुख केले. नंतर 1995 मध्ये ते परराष्ट्रमंत्री बनले. सोनिया गांधी या कॉंग्रेसच्या अध्यक्ष असताना मुखर्जी यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी केली. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील "यूपीए' आघाडीचे सरकार 2004 मध्ये सत्तेत आले, प्रणवदाही पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक जिंकले. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे स्थानही त्यांना मिळाले. 

मंत्रालयांचा कार्यभार सांभाळला 
प्रणवदांनी संरक्षण (2004-06), परराष्ट्र व्यवहार (2006-09) आणि अर्थ मंत्रालय (2009-12) या मंत्रालयांचा कार्यभार सांभाळला. याशिवाय लोकसभेतील नेते या नात्याने त्यांनी विविध मंत्रिगटांचेही नेतृत्व केले. जुलै-2012 मध्ये "यूपीए'ने प्रणवदांना राष्ट्रपतिपदासाठीचा उमेदवार केले आणि त्यांचे करिअर सर्वोच्च स्थानी पोचले. मुखर्जींनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पी. ए. संगमा यांचा सहज पराभव केला अन्‌ ते देशाचे तेरावे राष्ट्रपती बनले. प्रणव मुखर्जी यांनी 2017 मध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते, त्यांच्या या उपस्थितीवरून बराच वादंगही निर्माण झाला होता. संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे ते पहिले माजी राष्ट्रपती होत. 

राज्यशास्त्राचे अभ्यासक 
राज्यशास्त्र आणि इतिहास हे प्रणवदांचे आवडते विषय, याच विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. कोलकता विद्यापीठातून त्यांनी कायद्याची एलएलबी ही पदवीदेखील घेतली. पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यामध्ये क्‍लर्क म्हणून काम केल्यानंतर त्यांनी 1963 मध्ये ते विद्यानगर महाविद्यालयात राज्यशास्त्राचे सहायक प्राध्यापक बनले. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी "देशर दाक' या वर्तमानपत्रामध्ये पत्रकार म्हणूनही काम केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com