प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणात येणार नाहीत : शर्मिष्ठा मुखर्जी

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

'' देशाचे राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर माझे वडील सक्रीय राजकारणात पुन्हा प्रवेश करणार नाहीत''.

- शर्मिष्ठा मुखर्जी, प्रणव मुखर्जी यांच्या कन्या

नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पुन्हा राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. तसेच शिवसेनेने त्यांना 2019 च्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली होती. त्यावर आज प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सांगितले, की '' देशाचे राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर माझे वडील सक्रीय राजकारणात पुन्हा प्रवेश करणार नाहीत''.

प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात नागपूर येथे उपस्थिती लावली होती. त्यांच्या या उपस्थितीपूर्वी काँग्रेसने टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेने सांगितले, की जर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाहीतर पंतप्रधानपदासाठी प्रणव मुखर्जी यांच्या नावाचा विचार केला जाईल. तसेच भाजपला बहुमतासाठी आवश्यक जागा मिळण्याची शक्यता नाही. लोकसभेच्या या निवडणुकीत भाजप 110 जागा गमावण्याची शक्यता आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानावर शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हे स्पष्टीकरण दिले. शर्मिष्ठा म्हणाल्या, की ''श्री. राऊत, देशाचे राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यानंतर माझे वडील सक्रीय राजकारणात पुन्हा प्रवेश करणार नाहीत''. 

दरम्यान, नागपूर दौऱ्यापूर्वी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जींच्या दौऱ्याचा निषेध केला होता. त्यानंतर आता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. शर्मिष्ठा मुखर्जींच्या या स्पष्टीकरणामुळे प्रणव मुखर्जी यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Web Title: Pranab Mukherjee will not rejoin politics says daughter after Shiv Sena comment