मोदी लाटेपुढे व्यूहरचनाकार प्रशांत किशोरही पराभूत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मार्च 2017

गेल्यावेळी 2014 च्या लोकसभा निवडणुकांनंतर राजकीय व्यूहरचनाकारांना सुगीचे दिवस आले होते. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाचे श्रेय राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांनाही देण्यात आले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी बिहार राज्यातील निवडणुकांमध्ये नितीशकुमार यांच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. त्या वेळीही नितीशकुमार यांना भरघोस यश मिळाले. या यशानंतर प्रशांत किशोर ज्या पक्षांची व्यूहरचना करतील, त्यांचा विजय मानला जाऊ लागला. मात्र, उत्तर प्रदेश निवडणुकांनी मात्र हे चित्र पालटून टाकले.

उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांचे सर्व फासे उलटे पडले. उत्तर प्रदेशासहित पंजाब व गोवा राज्यांच्या निवडणुकांचे नियोजन प्रशांत किशोर यांच्याकडे होते. त्याप्रमाणे पंजाब आणि गोव्यामध्ये अपेक्षित यश मिळाले. मात्र उत्तर प्रदेशात मात्र साऱ्या व्यूहरचनांना सुरुंग लावण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा ही जोडी यशस्वी ठरली.

उत्तर प्रदेशात राहुल गांधी यांच्या सर्व रॅलींचे आयोजन प्रशांत किशोर यांनी केले होते. याचसोबत ब्राह्मण चेहरा म्हणून शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. याचसोबत राहुल गांधी यांच्या खाट सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सर्वांहून वेगळे म्हणजे समाजवादी पक्षासोबत युती करण्याची कॉंगेसची खेळी करण्यात प्रशांत किशोर यांची प्रमुख भूमिका मानली जाते. प्रशांत किशोर यांचे सर्व फासे उलटे पडले.

उत्तर प्रदेशातील राहुल गांधी यांच्या रॅलीला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. जी काही गर्दी व्हायची ती अखिलेश यांच्या करिष्म्यामुळेच. शीला दीक्षित यांना मुख्यमंत्रिपदाचा दावेदार घोषित करण्याचा निर्णय वाऱ्यावर विरून गेला. त्यानंतर निवडणूक प्रचारामध्ये शीला दीक्षित कुठेही दिसल्या नाहीत. खाट सभांचा तर अक्षरश: फज्जा उडाला. सभेला आलेल्या लोकांनी खाट पळवून नेल्या आणि राहुल गांधी यांची सोशल मीडियावर फिरकी घेण्यात आली.

उत्तर प्रदेशच्या बाबतीत प्रशांत किशोर यांच्या सर्व व्यूहरचना अयशस्वी ठरल्याने आगामी काळ व्यूहरचनाकारांसाठी अवघड जाणार आहे. प्रशांत किशोर यांच्या व्यूहरचनांमुळे निवडणुकांना इव्हेंटचे स्वरूप आले होते. मात्र, उत्तर प्रदेश निवडणुकांनी ही समीकरणे बदलून टाकली. अनेकांनी निवडणुकीच्या कलचाचणीमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळेल, असे अनुमान वर्तविले होते. मात्र भाजपला इतक्‍या मोठ्या प्रमाणात स्पष्ट बहुमत मिळेल अशी कोणीही आशा केली नव्हती. त्यामुळे भारतीय मतदारांचा कौल ओळखणे इतके सोपे नाही, हेच खरे!

Web Title: prashant kishor fails in Uttar Pradesh