कर्जबुडव्यांची नवी यादी लवकरच जाहीर करु: जेटली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

ज्या कर्जबुडव्यांवर दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाई आवश्यक आहे अशांची यादी तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तुम्हाला लवकरच याबाबत ऐकायला मिळेल. रिझर्व्ह बँकेने या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे

नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाई आवश्यक असलेल्या कर्जबुडव्यांची यादी करण्यास सुरुवात केली असून या कर्जबुडव्यांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. 

"ज्या कर्जबुडव्यांवर दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाई आवश्यक आहे अशांची यादी तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. तुम्हाला लवकरच याबाबत ऐकायला मिळेल. रिझर्व्ह बँकेने या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे," असे जेटली म्हणाले. सार्वजनिक बँकांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. 

बँकांच्या एकत्रीकरणाचा मुद्दा या बैठकीत अजेंड्यावर नव्हता मात्र याही प्रकरणी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असेही जेटली यावेळी म्हणाले. बँकांनी गेल्या सहा आठ महिन्यांमध्ये ग्राहकांना व्याजदरांचा पुरेसा लाभ दिला असून यापुढेही बँका कर्जवितरणासाठी आपापल्या परीने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील असे आश्वासन जेटली यांनी व्याजदर कपातीच्या मुद्द्यावर बोलताना दिले. 

राज्यानं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी केंद्रानं मात्र कर्जमाफीसंदर्भात हात झटकले आहेत. कर्जमाफीसाठी लागणारा संपूर्ण निधी हा राज्य सरकारनं उभा करावा असं जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. 

Web Title: Preparing list of top loan defaulters: Arun Jaitley