
President Droupadi Murmu : एकात्मिक क्रायोजेनिक इंजिन निर्मिती सुविधेचे उद्घाटन
बंगळूर : प्रगत तंत्रज्ञानाखाली क्रायोजेनिक इंजिनचे उत्पादन हा देशाच्या विज्ञान क्षेत्रातील एक मोठा मैलाचा दगड आहे. अंतराळ उपग्रह वाहकांसाठी क्रायोजेनिक इंजिन आवश्यक आहे. एचएएल हा १९९३ पासून इस्रोच्या अंतराळ संशोधनाचा कणा आहे. क्रायोजेनिक इंजिनचे उत्पादन देशासाठी अभिमानास्पद आहे, असे मत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.
येथील ‘एचएएल’ येथे एकात्मिक क्रायोजेनिक इंजिननिर्मिती सुविधा आणि दक्षिण क्षेत्र राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेचे उद्घाटन आणि भूमिपूजन केल्यानंतर त्या बोलत होत्या. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी भारत घडवण्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे योगदान अद्वितीय आहे. एचएएल ही संरक्षण दलांमागील शक्ती आहे असे म्हणता येईल.
क्रायोजेनिक आणि अर्ध-क्रायोजेनिक इंजिन तयार करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा मिळणे हा केवळ एचएएल आणि इस्रोसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. संरक्षण रणनीती आणि विकासामध्ये एचएएल आणि इस्रोचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. या दोन्ही संस्था देशाच्या संरक्षण आणि विकास कार्यक्रमात आणि विविध उपकरणांच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. क्रायोजेनिक इंजिन आणि उत्पादन सुविधा असलेला भारत हा जगातील सहावा देश बनविण्याच्या इस्रोच्या प्रयत्नांचे आणि वचनबद्धतेचे राष्ट्रपतींनी कौतुक केले.