काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू; राष्ट्रपतींची मंजुरी

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

काडीमोडीची भाजपची कारणे 
- काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद, कट्टरवाद व हिंसाचार वाढला 
- जम्मूला सापत्नभावाची वागणूक 
- केंद्राच्या विकास योजनांत मेहबूबा यांचे अडथळे 
- दहशतवाद्यांनी नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारास नख लावले. 
- पत्रकार बुखारी यांच्या हत्येने हिंसाचाराचा कळस गाठला 
-शस्त्रसंधी वाढवण्यावरून मतभेद 

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने जम्मू-कश्‍मीरमधील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीबरोबरची (पीडीपी) तीन वर्षांची युती दहशतवादाच्या मुद्यावर तोडल्यानंतर आज (बुधवार) जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू करण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली.

राज्याच्या मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याची घोषणा भाजपचे जम्मू-काश्‍मीर प्रभारी राम माधव यांनी मंगळवारी दुपारी केली. भाजपच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे राज्यपाल एन. एन. व्होरा यांचेकडे दिल्याचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांनी सांगितले. यापाठोपाठ मेहबूबा यांनीही आपला राजीनामा दिला. कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सनेही कोणाशीही युती न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या अशांत राज्याची सूत्रे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या हाती संपूर्णपणे आली आहेत. आज राष्ट्रपतींनीही राज्यपाल शासन लागू करण्यास मंजुरी दिली. राज्यपाल व्होरा यांनी राष्ट्रपतींकडे राज्यपाल शासन लागू करण्याची शिफारस केली होती.  

जम्मू-काश्‍मीरमधील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी काश्‍मिरातील परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यानंतर माधव, निर्मल सिंह, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आदींनी पत्रकार परिषद घेऊन मेहबूबा सरकारच्या पायाखालील सतरंजी ओढून घेतल्याची घोषणा केली. रमजानच्या महिन्यात केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबविली. यावरून दोन्ही पक्षांत मतभेद होते. मतभेदांमुळे भाजप यापुढे सत्तेत राहू शकत नाही. हुर्रियतसह साऱ्या फुटीरतावाद्यांशी सरसकट चर्चा करण्याची मेहबूबा यांची मागणी भाजपला मंजूर नव्हती, असे राम माधव यांनी युती तुटल्यानंतर स्पष्ट केले.  

काडीमोडीची भाजपची कारणे 
- काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद, कट्टरवाद व हिंसाचार वाढला 
- जम्मूला सापत्नभावाची वागणूक 
- केंद्राच्या विकास योजनांत मेहबूबा यांचे अडथळे 
- दहशतवाद्यांनी नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारास नख लावले. 
- पत्रकार बुखारी यांच्या हत्येने हिंसाचाराचा कळस गाठला 
-शस्त्रसंधी वाढवण्यावरून मतभेद 

जम्मू-काश्‍मीर विधानसभा बलाबल 
एकूण जागा : 87 
पीडीपी : 28 
भाजप : 25 
नॅशनल कॉन्फरस : 15 
कॉंग्रेस : 12 
अन्य : 7

Web Title: President Ram Nath Kovind approves imposition of Governors rule in J&K