हत्यार राष्ट्रपती राजवटीचे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

देशातील विविध राज्यांत आतापर्यंत सव्वाशेपेक्षा अधिक वेळा राष्ट्रपती राजवट जारी झाली आहे. महाराष्ट्रात असे प्रसंग यापूर्वी दोनदा निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट १७ फेब्रुवारी ते १८ जून १९८० या कालावधीत ११२ दिवस होती. त्या वेळी शरद पवार यांचे सरकार होते. दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू केली ती २८ सप्टेंबर ते ३० ऑक्‍टोबर २०१४ अशा ३३ दिवसांच्या कालावधीत.

देशातील विविध राज्यांत आतापर्यंत सव्वाशेपेक्षा अधिक वेळा राष्ट्रपती राजवट जारी झाली आहे. महाराष्ट्रात असे प्रसंग यापूर्वी दोनदा निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट १७ फेब्रुवारी ते १८ जून १९८० या कालावधीत ११२ दिवस होती. त्या वेळी शरद पवार यांचे सरकार होते. दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू केली ती २८ सप्टेंबर ते ३० ऑक्‍टोबर २०१४ अशा ३३ दिवसांच्या कालावधीत. त्या वेळी पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारबरोबर सत्तेत सामील राष्ट्रवादीने पाठिंबा मागे घेतल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.

का जारी केली राष्ट्रपती राजवट?
एखाद्या राज्याच्या सरकारने बहुमत गमावणे, कोणीही पक्ष सत्ता स्थापन करू न शकणे, आघाडी किंवा युतीतील अन्य पक्षांनी पाठिंबा काढणे या कारणांनी बहुतांश वेळा राष्ट्रपती राजवट जारी केलेली आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात राष्ट्रपती राजवट मोठ्या प्रमाणात लागू केली गेली. एखाद्या राज्यात निवडणुकीनंतर त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने तसेच खालावणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेनेही राष्ट्रपती राजवटीला आमंत्रण मिळालंय. विशेषतः पंजाब, जम्मू-काश्‍मीर आणि ईशान्येतील राज्यांत फुटीरतावादामुळे आसाम व त्रिपुरात वांशिक वादाने तर जातीय दंगलीमुळे उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे. 

इंदिराजींच्या काळात सर्वाधिक राष्ट्रपती राजवटी
सर्वाधिक राष्ट्रपती राजवट इंदिरा गांधी पंतप्रधान असताना लागू केली गेली. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात (जानेवारी १९६६ ते मार्च १९७७) ३५ तर दुसऱ्या कार्यकाळात (जानेवारी १९८० ते ऑक्‍टोबर १९८४) १५ वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना (मार्च १९७७ ते जून १९७९) १५, आणि डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना (मे २००४ ते मे २०१४) १२ तसेच पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधानपदाच्या काळात (जून १९९१ ते मे १९९६) ११ वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सत्ताकाळात (ऑगस्ट १९४७ ते मे १९६४) आठदा तसेच अटलबिहारी वाजपेयी (मार्च १९९९ ते मे २००४) आणि चंद्रशेखर (नोव्हेंबर १९९० ते जून १९९१) यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात प्रत्येकी पाच वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली गेली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने (मे २०१४ पासून आतापर्यंत) पाच वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह जम्मू-काश्‍मीर, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: president rule in maharashtra