‘एनडीए’चे पारडे जड राहण्याची चिन्हे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

presidential election Narendra Modi finalizes BJP candidates NDA
‘एनडीए’चे पारडे जड राहण्याची चिन्हे

‘एनडीए’चे पारडे जड राहण्याची चिन्हे

नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी तयारीला लागलेल्या भारतीय जनता पक्षाला एनडीएच्या परीघाबाहेरच्या नव्या पक्षांची साथ मिळण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे कॉंग्रेसच्या नवनेतृत्वाबद्दलच्या नाराजीतून कॉंग्रेसला काही राज्यांतील प्रमुख विरोधकांची साथ मिळणार नसल्याची चर्चा आहे. येत्या जूनमध्ये ही निवडणूक प्रस्तावित आहे. राष्ट्रपती-उपराष्ट्रपती निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम नावनिश्चिती पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीच्या मतदार कक्षाकडे (इलेक्ट्रोरल कॉलेज) नजर टाकली तर भाजपला अजूनही सुमारे ५ लाखांहून जास्त मते स्पष्ट बहुमतासाठी कमी पडत आहेत. राज्यसभेत भाजप सर्वांत मोठा पक्ष असला तरी स्पष्ट बहुमत अजूनही नाही. अर्थात यामुळे भाजपचे फार काही अडत नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी २०१७ मध्ये दाखवून दिले होते. आगामी राष्ट्रपतीपदासाठी मोदींचा कल महिला उमेदवारांकडे असल्याची चर्चा आहे. मात्र उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, माजी सभापती सुमित्रा महाजन, द्रौपदी मुर्मू या चर्चेतील नावांच्या पलीकडे मोदी एखाद्या वेगळ्याच उमेदवारांची घोषणा करण्याचे धक्कातंत्रही वापरू शकतात. या निवडणुकीत भाजपला एनडीएतील संयुक्त जनता दल व अण्णाद्रमुकसारख्या मोठ्या पक्षांची साथ मिळेल. शिवसेना व अकाली दल यावेळी भाजपसोबत नाहीत.

दुसरीकडे अनेक प्रादेशिक पक्ष भाजपच्या विरोधात जाऊ इच्छित नाहीत हे राज्यसभेत वारंवार दिसून आले आहे. आंध्रातील जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर कॉंग्रेस व ओडिशातील नवीन पटनाईक यांचा बीजू जनता दल यांचा ‘झुकाव'' भाजपकडे आहे. याशिवाय एकच पक्ष व एखाद दुसरा खासदार अशी स्थिती असलेले रिपब्लिकन पक्षासारखे (आठवले गट) अनेक पक्षही भाजपच्या बाजूनेच मतदान करणार हे उघड आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागू नये, म्हणून तसेच जीएसटी परतावा थकबाकीसह केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर यत्किंचितही परिणाम होऊ नये यादृष्टीने अनेक सरकारे आपला निर्णय करतील व त्या स्थितीत भाजपचे पारडे पुन्हा जड राहील, असे दिसते. भाजप नेतृत्वाने अनेक राज्यांतील मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली. त्यातही पारडे भाजपच्या बाजूने झुकणार याचे संकेत मिळाले.

विरोधकांची रणनिती कशी

पंजाबमध्ये ‘आप’ने मुसंडी मारली व राज्यसभेतही या पक्षाचे बळ वाढले आहे. दिल्ली व पंजाबातील घसघशीत संख्याबळ आधीच ‘आप’कडे आहे. अरविंद केजरीवाल हेही यूपीएला पाठिंबा देतील असे कोणी हमखास सांगू शकत नाही. अकाली दलाचे नेतृत्व यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा देईलच असे कोणीही सांगू शकत नाही. केजरीवाल, तृणमूल कॉंग्रेस नेत्या ममता बॅनर्जी, एमआयएम नेते सदुद्दिन ओवेसी आदी अनेक नेते केवळ सोनिया गांधी यांनी शब्द टाकला तरच यूपीएला पाठिंबा देऊ शकतात. सध्याच्याघडीला द्रमुक, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व डावे पक्ष यांचा यूपीएला पाठिंबा निश्चित मानला जातो.

Web Title: Presidential Election Narendra Modi Finalizes Bjp Candidates Nda

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top