नव्या राष्ट्रपतींची आज निवड; सायंकाळी पाचपर्यंत निकाल

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 जुलै 2017

राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यामध्ये रंगली लढत

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 17) झालेल्या मतदानानंतर 30 केंद्रांवरील मतपेट्या हवाई मार्गाने 'बिझनेस क्‍लास'मधून प्रवास करून दिल्लीत पोचल्या आहेत. देशाचा प्रथम नागरिक निवडण्यासाठीची मतमोजणी उद्या (ता. 20) होणार आहे. सकाळी अकराला मतमोजणीला प्रारंभ होईल, तर सायंकाळी पाचपर्यंत निकाल जाहीर होईल.

राष्ट्रपतिपदासाठी सत्ताधारी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधकांच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यामध्ये रंगलेल्या लढतीसाठी संसद भवन, त्याचप्रमाणे सर्व राज्यांच्या आणि दिल्ली व पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा मिळून 32 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. त्यातील दिल्ली विधानसभा आणि संसदवगळता अन्य सर्व राज्यांमधील मतपेट्या विमानाद्वारे दिल्लीत आणल्या आहेत. संसद भवनातील विशेष कक्षामध्ये या मतपेट्या ठेवल्या आहेत. सुमारे नऊ राज्यांमधील मतपेट्या सोमवारी दिल्लीत दाखल झाल्या होत्या. त्यातील दक्षिण भारतातील एका राज्यामधून मतपेटी मध्यरात्री दोनला पोचली होती, तर नागालॅंडमधील मतपेटी सर्वांत उशिरा म्हणजे काल रात्री पावणेदहाच्या सुमारास पोचल्याचे राष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि लोकसभेचे महासचिव अनुप मिश्रा यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

मतमोजणीसाठी चार टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, मोजणीच्या प्रत्येकी आठ फेऱ्या होतील आणि फेरीनिहाय निकालाचा तपशील जाहीर केला जाईल. सर्वप्रथम संसद भवनातील मतपत्रिकांची मोजणी होईल. त्यानंतर राज्यांच्या इंग्रजी आद्याक्षरांनुसार त्या त्या ठिकाणच्या मतपत्रिकांची मोजणी केली जाईल.

Web Title: presidential elections result thursday evening