कर्नाटक सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याचा भाजपच्या आमदारांचा पक्षनेत्यांवर दबाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

बंगळूर - काँग्रेसमधील असंतोषाचा लाभ उठविण्यासाठी काँग्रेस-धजद युती सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याचा भाजपच्या आमदारांचा पक्षनेत्यांवर दबाव वाढत आहे. मंत्रिमंडळ विस्तारास होत असलेला विलंब, मतदारसंघातील विकास अनुदान मंजुरीस होत असलेली दिरंगाई, बदली प्रकरणे यासह विविध कारणांवरून काँग्रेस आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत.

बंगळूर - काँग्रेसमधील असंतोषाचा लाभ उठविण्यासाठी काँग्रेस-धजद युती सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याचा भाजपच्या आमदारांचा पक्षनेत्यांवर दबाव वाढत आहे. मंत्रिमंडळ विस्तारास होत असलेला विलंब, मतदारसंघातील विकास अनुदान मंजुरीस होत असलेली दिरंगाई, बदली प्रकरणे यासह विविध कारणांवरून काँग्रेस आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत.

प्रामुख्याने मंत्रिमंडळ विस्तारावरून काही आमदार काँग्रेसवर नाराज आहेत. त्यामुळे २५ आमदार अधिवेशनापासून दूर रहाणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर अविश्वास ठराव सादर केल्यास राज्यातील युती सरकार अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. भाजप नेत्यांनी या संधीचा लाभ उठवावा, अशी भाजप आमदारांकडून मागणी होत आहे.

युतीचीही तयारी
अलीकडेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटकाच्या राजकारणात लवकरच भूकंप होणार असल्याचे वक्तव्य केले होते. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी त्यांना संधी मिळू नये, यासाठी काँग्रेस-धजद मित्र पक्षांनी प्रतितंत्र आखण्यास सुरवात केली आहे.

भाजपच्या विधिमंडळ पक्षाची २-३ दिवसांत बेळगावात बैठक होणार आहे. या बैठकीत अविश्वास ठराव मांडण्यावर सर्व आमदारांची मते जाणून घेण्यात येतील व त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल, असे सांगून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या आमदारांचे समाधान केले असल्याचे समजते.

ऑपरेशन कमळच्या बाबतीतही अनेक आमदार गोंधळात आहेत. एक पाय काँग्रेस पक्षात, तर दुसरा पाय भाजपात अशा दोलायमान स्थितीत काही काँग्रेस आमदार आहेत. यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेऊन सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणावा, अशी भाजप आमदारांनी मागणी लावून धरली आहे.
लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकणे आवश्‍यक आहे. यासाठी सरकार पाडून नवीन सरकार स्थापन केले तरी चालेल, त्यासाठी सर्व प्रकारचा पाठिंबा देण्यास भाजप हायकमांड सिध्द आहे, असा संदेश भाजप श्रेष्ठींनी राज्याच्या नेत्यांना पाठविला असल्याचे समजते. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केरळमध्ये एक आठवडा नैसर्गिक उपचार व विश्रांती घेऊन परत आले आहेत. अधिवेशनात सरकारला अडचणीत आणण्यासाठी येडियुरप्पा व्यूहरचना करीत आहेत. त्यांना सरकारविरुध्द अविश्वासाचे ब्रह्मास्त्र वापरण्याचा सल्ला त्यांच्या निकटवर्तीय आमदारांनी दिला आहे.

Web Title: pressure of BJP legislators on the issue of non-confidence against Karnataka government