एकाचवेळी दोन जागांवरून निवडणूक लढण्यास प्रतिबंध करावा

यूएनआय
बुधवार, 14 डिसेंबर 2016

काय म्हणतो कायदा...
निवडणूक कायद्यात 1996 मध्ये सुधारणा करून कोणत्याही उमेदवारास एकावेळी जास्तीतजास्त दोन जागांवरून निवडणूक लढण्यास परवानगी देण्यात आली होती. तत्पूर्वी याचे बंधन नव्हते. तो अनेक मतदारसंघातून निवडणूक लढू शकत होता. 2004 मध्ये निवडणूक आयोगाने याबाबत पहिल्यांदा शिफारस केली. होती, मात्र त्यावर पुढे कार्यवाही झाली नाही. आता नव्याने ही शिफारस करण्यात आली आहे.

 

निवडणूक आयोगाची कायदे मंत्रालयाकडे शिफारस

नवी दिल्ली : निवडणूक कायद्यात सुधारणा करून उमेदवाराला एकाचवेळी दोन जागांवरून निवडणूक लढण्यावर प्रतिबंध घालावा, अशी शिफारस निवडणूक आयोगाने कायदे मंत्रालयाकडे केली आहे.

उमेदवाराला एकाचवेळी दोन मतदारसंघातून निवडणूक लढण्यास कायद्याने मुभा आहे. मात्र, उमेदवार दोन्ही जागांवर निवडून आला तर, त्याला त्यापैकी एक जागा रिक्त करावी लागते. कायद्याने तो एकावेळी दोन्ही मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. परिणामी त्या जागेसाठी पुन्हा पोट निवडणूक घेऊन सर्व प्रकिया नव्याने पार पाडावी लागते. हा प्रकार एकाअर्थी मतदारांसाठी अन्यायकारक असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

रिक्त जागेसाठी पुन्हा निवडणूक घेणे म्हणजे प्रशासकीय यंत्रणा, सरकारी तिजोरी तसेच, मतदार या सर्वांवर एक अनाहूत ओझे आहे. जर का केंद्र सरकार यात कोणता बदल करण्यास तयार नसेल तर, अशा स्थितीत निवडणुकीच्या खर्चाची जबाबदारी संबंधित उमेदवारावर सोपवावी. किंवा मागे केलेल्या शिफारसीनुसार अशा उमेदवाराला निवडणूक खर्च म्हणून जमा कराव्या लागणाऱ्या रकमेत वाढ करावी, असे आयोगाने सुचवले आहे.

 

Web Title: To prevent the election from two places at the same time to fight