पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांना 'अच्छे दिन'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 मे 2018

2014 पासून ते 2017 या चार वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींची संपत्ती 41.8 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या संपत्तीतही वाढ झाल्याचे 'असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म' (एडीआर) आणि 'नॅशनल इलेक्शन वॉच' (एनईडब्लू) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. 

नवी दिल्ली : येत्या 26 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. 2014 पासून ते 2017 या चार वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींची संपत्ती 41.8 टक्क्यांनी वाढली आहे. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या संपत्तीतही वाढ झाल्याचे 'असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म' (एडीआर) आणि 'नॅशनल इलेक्शन वॉच' (एनईडब्लू) या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे. 
 
'एडीआर' आणि 'एनईडब्लू'ने याबाबत अहवाल जारी केला आहे. पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळातील 78 पैकी 72 मंत्री कोट्यधीश असून, पंतप्रधान मोदींच्या संपत्तीत 2014 पासून ते 2017 पर्यंत 41.8 टक्के म्हणजे सुमारे 2 कोटी रुपये वाढ झाली आहे. तसेच केंद्रीय मंत्री असलेले सदानंद गौडा यांच्या संपत्तीत 42.3 टक्के इतकी वाढ झाली आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या संपत्तीत 2015-17 या कार्यकाळात अधिक वाढ झाली आहे. 2015-17 दरम्यान तोमर यांच्या संपत्तीत 67.5 टक्के वाढ झाली. मात्र, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची संपत्ती कमी झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे.  

दरम्यान, सामान्यांना 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखविणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्यांनाच 'अच्छे दिन' आले असल्याचे या जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.  
 
  
 

Web Title: Prime Minister Modi Assets and Property Increases by 41 percent