पंतप्रधान मोदींनी चार वर्षांत केले 84 देशांचा दौरे ! 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 जुलै 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2017-18 आणि 2018-19 मधील विदेश दौऱ्यातील हॉटलाइन सुविधांच्या खर्चाचा समावेश यात नाही. त्याचप्रमाणे 2018-19 मधील चार्टर्ड विमानाच्या खर्चाचाही उल्लेख यामध्ये नाही.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या चार वर्षांच्या काळात 84 देशांचा दौरा केला आहे. या वेळी चार्टर्ड विमाने, विमानांची देखभाल आणि हॉटलाइन सुविधांसाठी एकूण 1484 कोटींचा खर्च केल्याची माहिती केंद्र सरकारने आज राज्यसभेत दिली. विदेश राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाला उत्तर देताना ही माहिती दिली. या वेळी त्यांनी तीन भागांत विभागणी करत एकूण किती खर्च आला, याची माहिती दिली. 

सिंह यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार 15 जून 2014 ते 10 जून 2018 दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमान देखभालीसाठी एकूण 1088.42 कोटी आणि चार्टर्ड विमानांवर 387.26 कोटी रुपये खर्च आला आहे. हॉटलाइनसाठी एकूण 9.12 कोटी रुपये खर्च आला आहे. मोदी यांनी मे 2014 मध्ये पंतप्रधानपद हाती घेतल्यापासून एकूण 84 देशांचा दौरा केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 2017-18 आणि 2018-19 मधील विदेश दौऱ्यातील हॉटलाइन सुविधांच्या खर्चाचा समावेश यात नाही. त्याचप्रमाणे 2018-19 मधील चार्टर्ड विमानाच्या खर्चाचाही उल्लेख यामध्ये नाही. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी यांनी 2015-16 मध्ये सर्वांत जास्त 24 देशांचा दौरा केला, तर 2017-18 मध्ये 19 आणि 2016-17 मध्ये 18 देशांचा दौरा केला. 2014-15 मध्ये मोदींनी 13 देशांचा दौरा केला. ज्यामध्ये पहिल्यांदाच पंतप्रधान म्हणून जून 2014 मध्ये त्यांनी भूतानला भेट दिली.

2018 मध्ये मोदींनी 10 देशांचा दौरा केला ज्यात चीनचा शेवटचा दौरा होता. पंतप्रधान मोदी यांच्या विदेश दौऱ्यातून व्यापार, विदेशी गुंतवणूकसहित महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये हातमिळवणी करण्याचा प्रयत्न असल्याचे व्ही. के. सिंह म्हणाले. 

Web Title: Prime Minister Modi made 84 countries tour in four years