पंतप्रधान मोदींचा आज ऊस शेतकऱ्यांशी संवाद

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

एकीकडे उसाच्या थकबाकीचा मुद्दा चर्चेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 29) महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि कर्नाटक या पाच राज्यांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 
 

नवी दिल्ली - एकीकडे उसाच्या थकबाकीचा मुद्दा चर्चेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 29) महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि कर्नाटक या पाच राज्यांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "7, लोककल्याण मार्ग' या निवासस्थानी हा संवाद कार्यक्रम होणार असून, यामध्ये दीडशे शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ सहभागी होईल. अलीकेडच पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतरचा हा संवादाचा दुसरा टप्पा असून, ऊस थकबाकी चुकती करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांवर पंतप्रधान बोलण्याची शक्‍यता आहे. 

उसाची थकबाकी 22 हजार कोटी रुपयांवर पोचल्यानंतर सरकारने उपाययोजना आरंभल्या. यामध्ये साखरेसाठी सात हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. तसेच, एक वर्ष मुदतीसाठी 30 लाख टन साखरेचा बफर साठा करण्याचा निर्णय सरकारने केला आहे. याशिवाय साखरेचे प्रतिकिलो 29 रुपये असे किमान विक्री मूल्यदेखील ठरविण्यात आले आहे. तसेच, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढविण्यासाठी 4400 कोटी रुपयांची आर्थिक प्रोत्साहनाची योजना राबविताना सी श्रेणीच्या मळीपासून बनविलेल्या इथेनॉलच्या दरात 40.85 रुपये प्रतिलिटर वरून 43.70 रुपये प्रतिलिटर आणि बी श्रेणीच्या इथेनॉलचे दर 47.49 रुपये प्रतिलिटर निश्‍चित करण्यात आले आहेत. यावर पंतप्रधान माहिती देतील, असे सांगितले जात आहे. 

Web Title: Prime Minister Modi today spoke to sugarcane farmers