
PM Modi : ‘फोडा व राज्य करा’ हेच काँग्रेसचे धोरण; पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुल्की : ‘‘ज्या लोकांना शांतता आणि विकास हवा असतो, तेथील जनता कॉंग्रेसला हद्दपार करते. समाजात शांतता असेल तर कॉंग्रेस स्वस्थ बसत नाही. देश जर विकासाच्या वाटेवर असेल तर कॉंग्रेसला हा विकास सहन होत नाही. कॉंग्रेसचे संपूर्ण राजकारण फोडा आणि राज्य करा या धोरणावरच चालते. कर्नाटकच्या जनतेने कॉंग्रेसचा हा भीषण चेहरा पाहिला आहे ’’, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मुल्की शहरात आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस पक्ष हा शांतता आणि विकासाचा शत्रू आहे, असा आरोप केला. कॉंग्रेसकडून दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना अभय दिले जाते आणि लांगुलचालनाला प्रोत्साहन देते. कर्नाटकाने औद्योगिक आणि कृषी विकासाबरोबरच आरोग्य आणि शिक्षणात पहिल्या क्रमांकाचे राज्य व्हावे, असे आमचे प्रयत्न आहेत.
परंतु कॉग्रेसला काय हवे आहे? राज्यातील कॉंग्रेस हे कर्नाटकाला दिल्लीत असलेल्या एका शाही कुटुंबासाठी पहिल्या क्रमांकाचे एटीएम करु इच्छित आहे. प्रत्येक योजनेत ८५ टक्के कमिशन खाणारे कॉंग्रेस कर्नाटकाला खड्ड्यात नेईल, असा घणाघाती आरोप पंतप्रधानांनी केला.
आज संपूर्ण जग लोकशाही व्यवस्था आणि विकास पाहून भारताचे कौतुक करत आहेत. परंतु रिव्हर्स गिअर कॉंग्रेस जगभरात देशाची बदनामी करत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कारण मतांच्या अधिकारावर दिल्लीत मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन केले आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान