esakal | पश्चिम बंगालमधील हिंसेची PM मोदींना चिंता; ममतांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

बोलून बातमी शोधा

narendra modi mamta

पश्चिम बंगालमधील हिंसेची PM मोदींना चिंता

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

कोलकाता- west bengal election result 2021 पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकाला लागल्यापासून राज्यात हिंसा सुरु झाली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी राज्यपाल जगदीप धनखड यांच्याशी चर्चा केली आणि पश्चिम बंगालमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मंगळवारी दुपारी ट्विट करुन याची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फोन करुन बंगालमध्ये सुरु असणाऱ्या हिंसेबाबत चिंता व्यक्त केली आहे. (prime minister narendra modi worry about west bengal violence)

पश्चिम बंगालमध्ये रविवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले, तेव्हापासून राज्यातील अनेक भागात हिंसा भडकली आहे. बंगालच्या अनेक जिल्ह्यात तोडफोड, जाळपोळ, लूटपाट, हत्येच्या तक्रारी समोर येत आहेत. भाजपने या हिंसेसाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरलं आहे. भाजपने आरोप केलाय की, नंदीग्राम, कोलकाता, आसनसोलसह अनेक भागात त्यांचे समर्थक, कार्यकर्त्यांची दुकाने लूटण्यात आली, घरांना आग लावण्यात आली. एवढेच नाही, तर महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत, अनेक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. बंगालमध्ये निकालानंतर सुरु झालेल्या हिंसेमध्ये आतापर्यंत ५ लोकांचा जीव गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा पश्चिम बंगालकडे रवाना झाले आहेत. शिवाय तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे. राज्यात सुरु असणाऱ्या हिंसेबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.

हेही वाचा: पश्चिम बंगाल : बॉम्बस्फोटात भाजपचे 6 कार्यकर्ते जखमी

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसने आरोप केलाय की, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे आणि टीएमसीच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. बंगालमध्ये सुरु असणाऱ्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. भाजप नेते राहुल सिन्हा यांचे म्हणणं आहे की, भाजप राज्यपाल आणि निवडणूक आयोगाकडे मागणी करतंय की जोपर्यंत हिंसा थांबत नाही, तोपर्यंत शपथ ग्रहन कार्यक्रम होऊ नये.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मोठा विजय प्राप्त केलाय. टीएमसीला राज्यात २१३ जागा मिळाल्या आहेत. भाजपनेही चांगली प्रगती केली असून ७७ जागांपर्यंत मजल मारली आहे. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ ३ जागा मिळवता आल्या आहेत. काँग्रेस आणि डाव्यांच्या आघाडीला पश्चिम बंगालमध्ये एकही जागा मिळवता आलेली नाही.