पंतप्रधानांचे भाऊ करणार सरकारविरोधात आंदोलन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 जून 2018

रेशन दुकानदारांना दर महिन्याला 30 हजार रुपये पगार किंवा त्यांना कमिशनच्या माध्यमातून तेवढ्या पैशांची व्यवस्था करावी; अन्यथा सरकारविरोधात आंदोलन करू, असा इशारा ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर्स फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी दिला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू आहेत. 
 

औरंगाबाद, - रेशन दुकानदारांना दर महिन्याला 30 हजार रुपये पगार किंवा त्यांना कमिशनच्या माध्यमातून तेवढ्या पैशांची व्यवस्था करावी; अन्यथा सरकारविरोधात आंदोलन करू, असा इशारा ऑल इंडिया फेअर प्राइज शॉप डीलर्स फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी दिला. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू आहेत. 

देशभरातील रेशन दुकानदार, डीलर्सच्या मागण्यांसंदर्भात फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दौरे सुरू केले आहेत. राज्यातील पहिल्या दौऱ्याची सुरवात आज येथून झाली. या वेळी प्रल्हाद मोदी यांनी पत्रकार परिषदेत आपल्या मागण्या समोर ठेवल्या. ते म्हणाले, ""अनेक वर्षांपासून गरिबांना अन्न पुरविण्याचे अविरत काम रेशन दुकानदार करीत आहेत. काळाच्या ओघात शिक्षण, वैद्यकीय खर्च, विजेचे बिल अशी वाढ झाल्याने महागाई वाढली आहे. परिणामी, जुन्याच पद्धतीने दिल्या जाणाऱ्या कमिशनमध्ये घर चालविणे अवघड आहे. त्यामुळे एक तर महिन्याला 30 हजार रुपये मानधन किंवा कमिशनच्या माध्यमातून घर चालविण्यासाठी तेवढे पैसे मिळतील, अशी व्यवस्था करावी.'' मागणीची पूर्तता झाली नाही, तर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. 

केरळमध्ये 16 हजार मानधन 
""केरळमध्ये 16 हजार रुपये मानधन दिले जाते. मग अन्य राज्यांत का नाही,'' असा सवाल संघटनेचे महासचिव विश्‍वंभर बसू यांनी उपस्थित केला. 

पंतप्रधानांना कसे सांगू? 
"तुमचे भाऊच पंतप्रधान असूनही मागण्या अद्याप का पूर्ण होऊ शकल्या नाहीत,' असा प्रश्‍न त्यांना विचारला असता. प्रल्हाद मोदी म्हणाले, ""ज्या नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आपले कुटुंब सोडत देशालाच आपले कुटुंब समजले आहे. थेट त्यांच्यासमोरच आमचे प्रश्‍न मांडणे, हे मला उचित वाटत नाही,'' असे त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Prime Minister's brother made a movement against the government