RBI Announcement Today : 'या' तारखेपर्यंत बँकेत जमा करा दोन हजारांच्या नोटा; रिझर्व्ह बँकेचं चोख नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI announcement today

RBI Announcement Today : 'या' तारखेपर्यंत बँकेत जमा करा दोन हजारांच्या नोटा; रिझर्व्ह बँकेचं चोख नियोजन

नवी दिल्लीः दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. मागील काही दिवसांपासून दोन हजारांच्या नोटा चलनामध्ये दिसत नाहीत. या नोटा बंद होणार? अशा चर्चाही नेहमी होतात. शेवटी आज छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन हजारांच्या नोटा बंद होणार नसल्या तरी त्यांची छपाई बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे गोंधळून जाण्याची गरज नाही, असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. दोन हाजारांच्या नोटा येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असं आरबीआयने जाहीर केलं आहे.

२३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेत जमा करुन बदलण्याची मुदत असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. कुठलीही गोंधळाची किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चार महिन्यांचा कालावधी नोटा बदलीसाठी देण्यात आलेला असल्याचं RBI ने स्पष्ट केलं. फक्त एकावेळी २० हजार रुपये बदलता येणार आहेत.

नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता. तेव्हा सर्वात मोठी असलेली एक हजाराची नोट बंद करुन दोन हजाराची नोट चलनात आणली होती. आता ही सर्वात मोठी असलेली दोन हाजारांची नोट हळूहळू बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा बाजार थांबविण्याच्या उद्देशाने नोटबंदी घोषित केली होती. त्यानंतर दोन हजाराची नोट चलनात आली होती. मात्र, काही दिवसांपासून ही नोट गायब झाल्यामुळे सदरील नोटा गेल्या तरी कुठे असे कोडे सर्वसामान्यांना पडले होते. चलनातून गायब झालेल्या या नोटा एटीएममध्येही दिसत नव्हत्या.

सुरूवातीच्या काळात दोन हजारांच्या नोटांची चलती होती. मात्र,नव्या पाचशे, शंभर रूपयांच्या नोटा चलनात आल्या आणि दोन हजारांच्या नोटांचे स्टॉक करणे सुरू केले. काळाबाजार करणाऱ्यांनी या नोटाचां स्टॉक करून ठेवला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आज आरबीआयने घेतलेल्या निर्णयाने गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :rbiCurrency