UK ची विमान सेवा तात्काळ थांबवा : पृथ्वीराज चव्हाण
तेथून येणा-या सर्व विमानातील प्रवाशांना अलगीकरणात ठेवणे आवश्यक असल्याचेही आमदार चव्हाण यांनी नमूद केले आहे.
सातारा : कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन ब्रिटनमध्ये नुकताच आढळला आहे. यामुळे कोरोगाग्रस्तांचा आकडा पुन्हा वाढताना दिसत आहे. सातासमुद्रापलिकडून आलेल्या या बातमीनंतर भारताची चिंताही वाढली आहे. नव्या संकटाची चाहूल लागताच देशातील केंद्रीय आरोग्य मंत्रालय जागरुक झाले आहे.
दरम्यान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (साेमवार) कोरोना विषाणूविषयी स्पष्टता येईपर्यंत सरकारने यूकेला जाण्यासाठी आणि येणारी सर्व विमान सेवा (उड्डाणे) तातडीने स्थगित करावी असे म्हटले आहे.
याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट केले आहे. ते लिहितात, कोरोना विषाणूविषयीच्या नव्या संसर्गावर स्पष्टता येईपर्यंत सरकारने यूकेला जाण्यासाठी आणि येणारी सर्व विमानांची उड्डाणे तातडीने स्थगित करावीत. तेथून येणा-या सर्व प्रवाशांना अलगीकरणात ठेवावे.