धक्कादायक : चक्क हेल्मेट घालून कांदा विक्री; कांद्यासाठी आधारकार्ड तारण

वृत्तसंस्था
रविवार, 1 डिसेंबर 2019

महाराष्ट्रातच नव्हे तर, इतर राज्यांमध्येही कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. या रोषाला सामोरं जावं लागताना एका कांदे विक्रेत्यानं चक्क हेल्मेट घालून कांद्याची विक्री केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

पाटणा : कांद्यांचे दर वाढल्याचे परिणाम केवळ किचनमध्येच नव्हे तर, देशभरात दिसत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, इतर राज्यांमध्येही कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. या रोषाला सामोरं जावं लागताना एका कांदे विक्रेत्यानं चक्क हेल्मेट घालून कांद्याची विक्री केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

बिहारमध्ये कांद्याचे दर वाढल्यामुळं बिहार स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग युनियन लिमिटेडने कमी दरांत कांद्याची विक्री करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पाटणासह वेगवेगळ्या शहरांमध्ये ही कांदा विक्री केंद्र सुरू केली असून, तेथे चक्क रांगेत उभे राहून कांदा खरेदी केली जात आहे. या केंद्रावर कांदा 35 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. पण, हा दरही जास्त असल्याचं अनेक ग्राहकांचं म्हणणं आहे. या कांदा विक्री केंद्रावर वादाचे प्रसंग घडत आहेत. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी पोलिस संरक्षणात कांदा विक्री करण्यासाठी अनुमती मागितली होती. पण, पोलिसांनी अशा प्रकारे संरक्षण देण्यास नकार दिला. त्यामुळं कर्मचाऱ्यांनी थेट हेल्मेट घालून कांदा विक्री करण्यास सुरुवात केली आहे.

या संदर्भात एएनआयने दिलेल्या वृत्तात रोहित कुमार या कर्मचाऱ्यानं म्हटलंय की, दोन दिवसांपूर्वी या केंद्रावर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली होती. आराह येथे ही घटना घडली त्यात आमचे कर्मचारी आणि काही ग्राहकही जखमी झाले होते. त्यामुळं आम्ही प्रशासनाकडं सुरक्षेची मागणी केली. पण, सुरक्षा मिळाली नसल्यानं आम्ही हेल्मेट वापरण्यास सुरुवात केलीय. कांद्याचा आणखी पुरवठा होणार असल्याने दर खाली येतील, असा विश्वास त्यानं व्यक्त केलाय. आम्ही प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाही. पण, आमच्या जिवाला धोका आहे, अशी भीती आम्हाला वाटत आहे, असं मत मनिष या कर्मचाऱ्यानं व्यक्त केलंय.

कांद्यासाठी आधार कार्ड तारण 
दरम्यान, कांद्याचे दर आटोक्यात आणण्यात अपयश आल्याबद्दल समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात भाजपला लक्ष्य केलंय. समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने कांद्यासाठी कर्ज मिळेल, अशी जाहिरात बाजी सुरू केली असून, सरकारवर उपहासात्मक टिका सुरू केली आहे. त्यासाठी आधार कार्ड तारण ठेवलं जातयं. कांद्याचे पैसे भागवल्यानंतर आधारकार्ड परत दिलं जाईल, अशी ही योजना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private employees selling onions wearing helmet in bihar patna