'यूपी'त प्रियांका गांधी मैदानात

priyanka gandhi
priyanka gandhi

प्रथमच अमेठी, रायबरेलीबाहेरही प्रचार करणार

लखनौ : सध्या राजकीय आघाडीवर मागे पडलेल्या कॉंग्रेस पक्षाने अखेर आपला हुकमी एक्का बाहेर काढत प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या राजकीय रणांगणात उतरविले आहे. कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये आता प्रियांका यांचाही समावेश करण्यात आला असून, त्या प्रथमच अमेठी आणि रायबरेलीबाहेर प्रचार करतील. कॉंग्रेसने मात्र प्रियांका यांच्या प्रचाराची रूपरेखा उघड केलेली नाही, निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात पोचला असताना ही रूपरेखा जाहीर केली जाण्याची शक्‍यताही कमीच असल्याचे बोलले जाते.

प्रियांका गांधी या मागील वर्षभरापासून उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या होत्या. त्यांना राजकारणात लॉंच करण्यामागे कॉंग्रेसचे रणनितीकार प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा होता. प्रियांका यांना केवळ अमेठी आणि रायबरेलीपर्यंत मर्यादित ठेवले जाऊ नये, असे आग्रही मत त्यांनी कॉंग्रेसश्रेष्ठींसमोर मांडले होते. आता प्रियांका यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपविली जाणार असून, प्रचार मोहिमेवरदेखील त्यांचे पूर्ण नियंत्रण राहील.

अन्य प्रचारक
कॉंग्रेसच्या अन्य स्टार प्रचारकांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचाही समावेश आहे. सचिन पायलट, ज्योतिरादित्य सिंधिया, मनीष तिवारी आणि कुमारी शैलजा यांच्यासारखे तरुण चेहरेदेखील पक्षाचा प्रचार करतील. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आज ही यादी प्रसिद्ध केली. सलमान खुर्शिद, शकील अहमद, अहमद पटेल आणि जुबैर खान यांच्यासारख्या अल्पसंख्याक चेहऱ्यांनाही प्रचाराच्या मैदानात उतरविण्यात आले आहे.

रिमी सेन भाजपमध्ये
सिने अभिनेत्री रिमी सेनने भाजपमध्ये प्रवेश केला असून, भोजपुरी मॉडेल कशिश खाननेही कमळ हातात घेतले आहे. सिने अभिनेते सनी देओलदेखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. मध्यंतरी अर्जुन रामपालनेही भाजपच्या प्रदेश मुख्यालयास भेट दिल्यानंतर त्याच्याही पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. दरम्यान, स्टार मंडळींच्या पक्षप्रवेशाचा भाजपला कितपत फायदा होईल, याबाबत साशंकताच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com